Home बातम्या ऐतिहासिक महिला व बालविकास विभागाच्या तत्पर मदतीने एका दिव्यांग मुलीला मिळाला कायमस्वरूपी निवारा

महिला व बालविकास विभागाच्या तत्पर मदतीने एका दिव्यांग मुलीला मिळाला कायमस्वरूपी निवारा

0
महिला व बालविकास विभागाच्या तत्पर मदतीने एका दिव्यांग मुलीला मिळाला कायमस्वरूपी निवारा

मुंबई,दि. 13 – महिला व बालविकास विभागाच्या फेसबुक पेजवर पुण्यातील सजग नागरिकाने एका अनाथ दिव्यांग मुलीचा सांभाळ करणारे कोणीही नसून ती सध्या रस्त्यावर राहत आहे, हे निदर्शनास आणून दिले. याबाबत एकात्मिक बाल विकास आयुक्त तथा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल यांना माहिती दिली असता त्यांनी यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून अवघ्या 6 तासात संबंधित मुलीच्या कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था केली आहे.

दिनांक 12 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 7 च्या सुमारास पुण्यातील सजग नागरिक राहुल जाधव यांनी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या फेसबुक पेज वर मेसेज केला. त्यात पुण्यातील एक वीस वर्षीय दिव्यांग रस्त्यावर राहत असून तिच्या आईचे 3 महिन्यापूर्वी निधन झाले असून तिचा सांभाळ करणारे कोणीही नसल्याचा उल्लेख केला. तसेच तिला सर्वतोपरी मदत करण्यासाठी तो तयार असून त्यांनी त्याकामी शासकीय यंत्रणेच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. ही माहिती महिला व बाल विकास विभागाचे सोशल मीडिया प्रमुखांनी दि. 13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.45 वा. एकात्मिक बाल विकास आयुक्त तथा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल यांना दिली. त्यावर त्यांनी तातडीने ही माहिती पुणे महिला व बाल विकास आयुक्त आर.विमला यांना देत त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणात तत्काळ कार्यवाही करत श्रीमती विमला यांनी त्या मुलीला मुंढवा येथील महिला वसतिगृहात दाखल करत तिच्या राहण्याची व्यवस्था केली.

सजग नागरिक आणि सामाजिक बांधिलकी जपत कार्य करणारे अधिकारी असतील तर सामान्य नागरिकांचे प्रश्न तत्काळ मार्गी लागतात एवढे मात्र नक्की.

प्रतिक्रिया 

मी महिला व बाल विकास विभागाच्या फेसबुक पेजवर संबंधित मुलीबाबत माहिती दिली असता मला विभागाकडून तत्काळ रिप्लाय आला. विशेषतः काही तासांमध्ये विभागाने या मतिमंद मुलीच्या कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था केली. शासकीय विभागाकडून इतक्या लवकर आणि सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. मी महिला व बालविकास विभागाच्या सोशल मीडिया टीम आणि सर्व अधिकारी – कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

– राहुल जाधव, सजग नागरिक, पुणे.

00000

एक महिला अधिकारी म्हणून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून हा विषय संवेदनशीलतेने हाताळत मार्गी लावून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिले. अवघ्या 6 तासात कागदोपत्री कारवाई पूर्ण करत आम्ही त्या मुलीला शासकीय संस्थेत दाखल केले याचा मला आनंद आहे.

– रुबल अग्रवाल, एकात्मिक बाल विकास आयुक्त तथा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक