जगातील दुर्मिळ घटना
डॉक्टरांनी सांगितले की या महिलेची प्रसुती सिझेरियन शस्त्रक्रियेने केली आहे. हलीमाची प्रसुती झाली असली तरी तिला आणखी काही आठवडे रुग्णालयात थांबावे लागणार आहे. अति रक्तस्त्राव आणि रक्त संक्रमणानंतर हलीमा यांची प्रकृती आता चांगली आहे. हलीमाचा नवरा अजूनही मालीमध्ये असल्याची माहिती माली सरकारने दिली. वेळेआधीच हलीमाची प्रसुती झाली. एकाच वेळी ९ मुलांना जन्म देणे ही अतिशय दुर्मिळ घटना आहे. आता जगातील अशा प्रकारची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि मलेशियामध्ये महिलांनी ९ मुलांना जन्म दिला होता. तथापि, या मुलांचा जन्म झाल्यावर लवकरच त्यांचा मृत्यू झाला.
हलीमाची नऊ मुले जगल्यास होईल विक्रम
हलीमाची नऊ मुले जिवंत राहिल्यास तो एक विक्रम होईल. याआधी वर्ष २००९ च्या सुरुवातीस नाद्या सुलेमान यांनी ८ मुलांना जन्म दिला होता आणि ते सर्व सुखरूप होते. आरोग्य विभागाने सांगितले की जवळपास ३० आठवड्यांची मुले ही ३९.९ सेंटीमीटर लांबीची आहेत. रूग्णालयाने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये डॉक्टर आणि नर्स या बाळांची काळजी घेत असल्याचे समोर आले आहे. रुग्णालयात त्यांची संपूर्ण काळजी घेतली जात आहे जेणेकरून मुलांचे प्राण वाचू शकतील. प्रसूती आधीच हलीमाला हवाईमार्गे मोरोक्को येथे आणले गेले. हलीमाची प्रसुती करणारे डॉक्टर याजीद मुराद म्हणाले की, सर्व मुले जवळपास ३० आठवड्यांची आहेत. प्रसूती करण्यास उशीर करण्याचा प्रयत्न केला गेला. जेणेकरून मुलांचे प्राण वाचण्याची शक्यता अधिक वाढू शकेल. हलीमाची प्रसुती २५ व्या आठवड्यांमध्ये होणार होती. मात्र, आम्ही केलेल्या प्रयत्नांमुळे ही प्रसुती ३० आठवड्यांपर्यंत लांबली. त्यामुळे बाळ दगावण्याचा धोका कमी झाला.
३० आठवड्यांचे बाळ जिवंत राहण्याची अधिक शक्यता
डॉक्टर मुराद यांनी सांगितले की, सामान्यत: ३० आठवड्यांच्या आसपास जन्माला येणाऱ्या बाळांवर योग्य उपचार केल्यास त्यांचे प्राण वाचण्याची शक्यता अधिक असते. अशा प्रकरणात ८० टक्के बाळ दगावत नाहीत. २५ व्या आठवड्यात जन्माला येणारे बाळ जगू शकते का, याबाबत माझ्या मनात शंका होती. त्यामुळे प्रसुती पाच आठवडे लांबवली. हलीमाला माली सरकारने ३० मार्च रोजी मोरोक्कोला प्रसुतीसाठी पाठवले होते. तिच्यासोबत मालीमधील एक डॉक्टरही आहेत. त्यांच्याकडून माली सरकारला वेळोवेळी माहिती दिली जात आहे.