
ठाणे, दि.12 (जिमाका):- माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हातून सातत्याने अशीच समाजाची सेवा घडत राहावी, अशी प्रार्थना मी ईश्वरचरणी करतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडी तालुक्यातील माणकोली येथे आयोजित ‘केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2025’ च्या अंतिम सामन्याच्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार सुलभा गायकवाड, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, आयोजक प्रताप पाटील, क्रिकेटचे विविध संघ, खेळाडू, प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मला आनंद आहे की, या स्पर्धेला माझी दरवर्षी उपस्थिती असते. मात्र यावर्षी मुख्यमंत्री झाल्यानंतर हजेरी लावण्याची इच्छा असताना देखील येता येईल की नाही अशी परिस्थिती होती. कारण अधिवेशन सुरू होते. आज इथे इतका मोठा कार्यक्रम होतो आहे. बक्षीस म्हणून 51 बाईक्स आहेत, 2 इलेक्ट्रिक कार आहेत. मला असे वाटते की, या ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा सोहळा हा कपिल पाटील यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने होतोय. संपूर्ण देशातून खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले, कपिल पाटील यांचा स्वभाव आहे की, ते कुठलीही गोष्ट, लहान होऊ देत नाहीत. भव्यता हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट करायची तर ती भव्य दिव्यच करायची, ही त्यांची खासियतच आहे.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, कपिलजी सांगत होते की, माजी झालो तरी लोकं मोठ्या संख्येने आले. मात्र आपण कधीच माजी होत नाही. निवडणुका येत असतात, जात असतात. लोकांच्या मनामध्ये आपण कायम असायला हवे. लोकांच्या मनातून माजी झालो नाही म्हणजे सगळं मिळवले, असे समजायचे.
कपिल पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कपिल पाटील यांच्या हातून सातत्याने अशीच समाजाची सेवा घडत राहावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
0000000