मुंबई, दि. 2 – शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 15 टक्के गुणांची सवलत देण्यात आलेली आहे. ही सवलत घेण्यासाठी पात्र उमेदवारांना माजी सैनिक आरक्षणांतर्गत नोंद करण्याकरीता https://mahatet.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यांनी 10 ऑगस्ट 2022 पर्यंत आवश्यक ते बदल करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021’ चे आयोजन 21 नोव्हेंबर 2021 रोजी करण्यात आले होते. त्यानंतर दि. 30 जून 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 15 टक्के गुणांची सवलत देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्ज भरताना माजी सैनिक आरक्षणांतर्गत नोंद घेण्यात आलेली नाही. तसेच नावातील स्पेलिंग बदल व जातसंवर्ग बदल करण्याबाबत उमेदवारांकडून निवेदने प्राप्त होत आहेत. उमेदवारांच्या नावातील स्पेलिंग/ जात संवर्गबाबतची दुरूस्ती असल्यास ही दुरूस्ती करण्यासाठी तसेच माजी सैनिक आरक्षणांतर्गत नोंद करण्याकरीता https://mahatet.in या संकेतस्थळावरील उमेदवारांच्या Login मध्ये सुविधा देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी आपले निवेदन दि. 10 ऑगस्ट 2022 पर्यंत देणे आवश्यक असून नावातील स्पेलिंग बदल करण्यासाठी एसएससी प्रमाणपत्र, जात संवर्ग बदल करण्यासाठी जात प्रमाणपत्र तसेच माजी सैनिक आरक्षणाकरीता सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र Upload करणे आवश्यक आहे. यापूर्वी लेखी/ ई-मेलद्वारे निवेदन दिले असले तरीही उमेदवारांनी पुन्हा: आपल्या Login मध्ये Update करणे गरजेचे आहे.
मुदतीनंतर तसेच अन्य प्रकारे (ई-मेल, फोन संदेश, लेखी पत्र इत्यादी) आलेल्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही. प्राप्त सर्व दुरूस्त्यांचा विचार करून परीक्षा निकाल https://mahatet.in या संकेत स्थळावर जाहीर करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी कळविले आहे.
000