माण खटाव बरोबर राज्यातील दुष्काळ कायमचा संपवण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे – मंत्री जयकुमार गोरे – महासंवाद

    - Advertisement -

    सातारा दि २३ – महावितरणने चांगले नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावेत जेणेकरुन ट्रान्सफॉर्मर नसल्याने पाणी पुरवठा थांबू नये. तसेच ट्रान्सफॉर्मर नसल्यामुळे थांबलेल्या पाणीपुरवठा योजनांसाठीही निधी उपलब्ध करण्यात येईल. पशुधन हे आमची ताकद. पशुधनाची सर्वतोपरी काळजी घेणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
    माण तालुक्यातील गोंदवले येथील शेतकरी भवन येथे माण खटाव तालुक्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीत करावयाच्या बाबत ग्रामविकास व पंचायतराजमंत्री गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार धैर्यशील कदम, जिल्हा परिषद सदस्य सोनिया गोरे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी आणि तालुक्यातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


    शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पाच हजाराची अग्रिम मदत दिली. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानून ग्रामविकास मंत्री श्री. गोरे म्हणाले, राज्य शासनाने संवेदनशीलतेने दुष्काळ जाहीर करून उपाययोजना सुरू केल्या आहेत. शंभर टक्के पंचनामे पूर्ण केले. दुष्काळासाठी मंत्री मंडळ उपसमिती स्थापन केली. कोणीही कमी किंमतीत जनावरे विकून नुकसान करून घेऊ नये. शासकीय अधिकाऱ्यांनी पाणी चारा उपलब्ध करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी. चारा पाणी उपलब्धता सुनिश्चित करणे यापेक्षा महत्वाचे इतर कोणतेही काम नाही. सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणीच रहावे. जलसंधारण व तलाव दुरुस्ती, गाळ काढणे, गळती थांबवणेही कामे प्राधान्याने करावीत.

    औंध पाणी पुरवठा योजनचे दि.२० डिसेंबर रोजी उद्घाटन घ्यावे असे सांगून मंत्री श्री गोरे म्हणाले, मार्डी योजनेतील उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत.  ट्रान्सफॉर्मर नसल्याने पाणी पुरवठा थांबू नये यासाठी महावितरणने चांगले नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावेत, डिपी चोरी होत असलेल्या भागात ग्रामस्थानी दक्षता घ्यावी. तालुका अथवा जिल्हा पातळीवर सरासरी नियोजन करण्याऐवजी ग्राम पातळीवर चार उपलब्धता याचे नियोजन करावे. ग्राम पातळीवर चारा उपलब्धता वाढवावी. पाणी उपलब्धतेसाठीही गाव निहाय नियोजन करावे. आवश्यक ठिकाणी बंधारे व इतर प्रकल्प यांची दुरुस्ती तातडीने हाती घ्यावी.  रोजगार हमीची जास्तीत जास्त कामे हाती घ्यावीत. जलसंधारण विभागाने जास्तीत जास्त तलावांमध्ये गाळ काढण्याची कामे सुरू करावीत. अशा सूचनाही ग्रामविकास मंत्री गोरे यांनी दिल्या.

    यावेळी ग्रामीण पाणी पुरवठा, कृषी, महावितरण, पशुसंवर्धन, जीवन प्राधिकरण, भुजल सर्वेक्षण, मृदा व जलसंधारण, सिंचन, लघु पाटबंधारे, रोजगार हमी योजना, जिहे कठापूर उपसा सिंचन योजना या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच माण व खटाव तालुक्यातील चारा पाणी उपलब्धता यांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.
    000

    - Advertisement -