
हिंदी टीव्हीविश्वात तब्बल ५ वर्षांहून अधिक काळ गाजलेली ‘
पवित्र रिश्ता‘ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतील मानवची आई म्हणजेच अभिनेत्री
उषा नाडकर्णी यांनी त्या मालिकेच्या नव्या सीझनबद्दल उत्सुक असल्याचं ‘मुंटा’ला सांगितलंअलीकडेच मालिकेतील अर्चना म्हणजे अभिनेत्री
अंकिता लोखंडे हिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून नव्या सीझनचा टीझर शेअर केला होता. पण या सीझनचं वैशिष्ट्य म्हणजे यात अंकिता अर्चनाच्या भूमिकेत दिसणार असली तरी मानवच्या भूमिकेत मात्र अभिनेता शाहीर शेख दिसणार आहे. त्याव्यतिरिक्त उषा नाडकर्णी पुन्हा एकदा मानवच्या आईच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
नव्या सीझनमधील भूमिकेविषयी त्या म्हणाल्या, ‘आम्ही शूटिंगला सुरुवात केली असून काही प्रसंगांचं चित्रीकरण झालं आहे. त्यात मी मानवची आई असले तरी मागच्या सीझनपेक्षा ही भूमिका थोडी वेगळी आहे. याही सीझनमध्ये आम्ही चाळीतच राहताना दिसणार आहोत. यावेळीही मानवची आई तडकाफडकीच बोलताना दिसेल. परंतु मी आधी जशी कपडे धुताना किंवा पाणी भरताना दिसायचे तसं आता नाहीय. आताची आई ही अनेकांना घरकामासाठी बाई पुरवते आणि त्यांच्याकडून कमिशन घेते.
‘ ‘पवित्र रिश्ता’मधील मानव म्हणजेच दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत विषयी त्या म्हणाल्या, ‘येत्या सीझनमध्ये शाहीर मानवच्या भूमिकेत दिसणार आहे. पण त्याला जेव्हा मी सेटवर पाहते तेव्हा मला तो अगदी सुशांत असल्यासारखाच वाटतो. मी त्याला हे सांगितलंसुद्धा आहे.’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला नक्की कधी येणार हे मात्र अद्याप कळलेलं नसलं तरी मालिकेच्या चाहत्यांमध्ये याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
Source link