नाशिक, दि. 19 सप्टेंबर 2022 (जिमाका वृत्तसेवा): गावातील प्रत्येक नागरिकाला स्थानिक पातळीवर आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध योजनांच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविण्यावर भर दिला जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत मानवतेच्या दृष्टिकोनातून नागरिकांना दर्जेदार सुविधांचा लाभ उपलब्ध करून द्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.
आज मालेगाव तालुक्यातील निमगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व कर्मचारी निवासस्थानांचे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार बोलत होत्या. या कार्यक्रमास राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. तर आमदार सुहास कांदे, निमगावच्या सरपंच सरला जगताप, आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निलेश सोनवणे, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम, निमगावच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी शिंदे यांच्यासह प्राथमिक रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका, अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ प्रत्यक्ष उपस्थित होते.
यावेळी डॉ. पवार म्हणाल्या की, या आरोग्य केंद्र इमारतीसाठी सुमारे 5 कोटी निधी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून प्राथमिक उपचारासाठी 13 गावांना आरोग्य सुविधा मिळणार असून 27 प्रकारच्या चाचण्या मोफत होवून 75 प्रकारची औषधे येथे मिळणार आहेत. या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना स्थानिक पातळीवर आवश्यक आरोग्य सेवासुविधा माफक दरात मिळाव्यात, त्यांचा
खाजगी रुग्णालयांमध्ये होणारा खर्च कमी व्हावा, यासाठी आरोग्य विभागाने काटेकोरपणे आपली जबाबदारी पार पाडावी. आरोग्य केंद्राच्याबाबतीत कोणाचीही तक्रार येणार नाही यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावे, असेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी सांगितले.
केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची माहिती देणारे फलक सर्व आरोग्य केंद्रांच्या दर्शनी भागात लावण्यात यावेत. जेणेकरून नागरिकांना आरोग्य योजनांची माहिती मिळून त्याचा लाभ घेणे सोपे होईल. त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून रुग्णांना पाच लाखांची मदत मिळते. या योजनांची माहिती होण्याकरिता ग्रामसेवकांच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये यादी लावण्याच्या सुचना देण्यात आल्या असून त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. आरोग्य क्षेत्रात डॉक्टरांना ईश्वराप्रमाणे सन्मान दिला जातो. त्याअनुषंगाने डॉक्टरांनी रुग्णसेवा करतांना आपल्या कर्तव्यात कमी पडणार यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येकाला या आरोग्य सेवा नियमितपणे मिळण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. आरोग्य विषयक योजनांपासून कोणीही गरजू वंचित राहणार नाही, यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले की, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. जनतेला आरोग्याच्या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण सुविधा देण्यासाठी व आरोग्य यंत्रणा बळकटीकरणासाठी शासन कटीबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी निमगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे व कर्मचारी निवासस्थानाचे केंद्रीय राज्यमंत्री यांच्या हस्ते फित कापून आरोग्य केंद्राचे उद्घाटन व कोनशीलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी आमदार सुहास कांदे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी प्रास्ताविकातून आरोग्य केंद्राच्या इमारतीबाबत थोडक्यात माहिती दिली.
सोलर सिस्टीममुळे अखंड वीज पुरवठा मिळण्यास मदत: केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार
ग्रामीण भागातील नागरिकांना शंभर टक्के आरोग्य सुविधा मिळतील याकडे सर्व आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी लक्ष द्यावे. सोलर सिस्टीम मुळे विजेची बचत होऊन आरोग्य केंद्रांना अखंडीत वीज पुरवठा होण्यास मदत होणार आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले. चांदवड तालुक्यातील पाचही प्राथमिक आरोग्य केंद्राना सीएसआर निधीमधून आयएसटीपीएल कंपनीकडून देण्यात आलेल्या सोलर सिस्टीमचे लोकार्पण आज डॉ. पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
000