चंद्रपूर, दि. 11: मानोरा व लगतच्या परिसरातील गावांमधील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी नागरिकांनी मानोरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याची मागणी केली होती. कळमना आणि मानोरा हे अंतर जास्त नव्हते. मात्र विशेष बाब म्हणून मी या विषयाचा प्रयत्नपूर्वक पाठपुरावा केला. विधानसभेत संसदीय आयुधांचा वापर करत ही मागणी रेटली व विशेष बाब म्हणून मानोरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करविले. मानोरा आणि कळमना या दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातुन या परिसरातील नागरिकांना उत्तम व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळेल व ही दोन्ही आरोग्य केंद्रे रूग्णसेवेच्या दृष्टीने आदर्श ठरतील, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
बल्लारपूर तालुक्यातील कळमना आणि मानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे लोकार्पण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी चंदनसिंह चंदेल, जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी डॉ. दिप्ती सुर्यवंशी, तहसिलदार कांचन जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपील कलोडे, संवर्ग विकास अधिकारी किरण धनवडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. निवृत्ती राठोड, माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्हयात उत्तम आरोग्य सेवा जनतेला मिळावी यासाठी आपण नेहमीच प्राधान्याने लक्ष दिले आहे. टाटा ट्रस्टच्या सहकार्याने कॅन्सर हॉस्पीटल उभारण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय कार्यान्वीत करण्यात आले आहे. अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्हयात 14 नविन प्राथमिक केंद्रांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. पोंभुर्णा येथे अद्यावत व सर्व सोयींनी सुसज्ज अशा ग्रामीण रूग्णालयाचे बांधकाम करण्यात आले.
खनिज विकास निधीच्या माध्यमातुन आदिवासी बहुल भागातील भंगाराम तळोधी, नांदा, जिवती आणि राजोली या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम, बल्लारपूर येथे ग्रामीण रूग्णालय, ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र, वसतीगृह व मेसचे बांधकाम, पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय गोंडपिपरी येथे मुख्य इमारतीचे बांधकाम व निवासस्थानाचे बांधकाम, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पागतच्या आदिवासी बहुल गावांमध्ये फिरते रूग्णालय उपलब्ध, चंद्रपूर जिल्हयात पहिल्यांदाच बल्लारपूर येथे रेल्वेमार्फत लाईफलाईन एक्सप्रेसच्यसा माध्यमातुन रूग्णसेवा हे उपक्रम त्यांच्या पुढाकाराने राबविण्यात आले, श्री साई संस्थान शिर्डी तर्फे सामान्य रूग्णालय चंद्रपूर येथे एमआरआय मशीनसाठी 7 कोटी रू. निधी मंजूर करण्यात आला. आरोग्य क्षेत्रासाठी मोठया प्रमाणावर निधी आपण उपलब्ध केला आहे. या पुढील काळातही आरोग्य क्षेत्राकडे विशेष लक्ष देत या जिल्हयातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू, असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
यावेळी वैद्यकिय अधिकारी, परिचारीका, उत्तम इमारत साकारणारे कंत्राटदार आदींचा सत्कार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमांना नामदेव डाहूले, आशीष देवतळे, किशोर पंदिलवार, माजी जि.प. सदस्य हरीश गेडाम, वैशाली बुध्दलवार, गौतम निमगडे, रमेश पिपरे, पंचायत समितीचे माजी सभापती राजू बुध्दलवार, माजी पंचायत समिती सभापती इंदिरा पिपरे, सरपंच सरला परेकर, उपसरपंच रूपेश पोडे, सोमेश्वर पदमगिरीवार, लहूजी टिकले, ज्ञानेश्वर लोहे, मोरेश्वर उदिसे, दत्ता पोडे, कळमना व मानोरा ग्राम पंचायतीच्या सदस्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.