मान्सून काळात आपत्तीवर सर्व विभागांनी समन्वयाने मात करावी; नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे – महासंवाद

मान्सून काळात आपत्तीवर सर्व विभागांनी समन्वयाने मात करावी; नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे – महासंवाद
- Advertisement -

पुणे, दि. २३: गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच आगामी मान्सूनमधील पावसाचा अंदाज पाहता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसोबत सर्वच संबंधित विभागांनी समन्वय ठेऊन आपत्तीवर मात करण्यासाठी काम करावे. आपत्तीबाधित नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करावे, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेत आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त बापू बांगर, उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर आदी यावेळी उपस्थित होते.

आगामी काळातही सरासरीइतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस राहण्याची हवामान विभागाची माहिती पाहता महानगरपालिकेने कोणत्याही आपत्तीला सामोरे जाण्यासाठी पूर्वतयारी करावी. नालेसफाईची उर्वरित कामे गतीने पूर्ण करावीत. पावसादरम्यान ज्या ठिकाणी पाणी साचते असे नागरी भाग व झोपडपट्ट्यांची माहिती महानगरपालिकेकडे असते. आपत्तीकाळात व पूरस्थितीमध्ये बाधितांना सुरक्षित जागी हलविण्यासाठी निवारा केंद्रांची व्यवस्था करावी.

निवारा केंद्रात नागरिकांना हलवण्याबाबतचे योग्य नियोजन करावे. त्या ठिकाणी हलविण्यात येणाऱ्या नागरिकांना अन्न, निवास व्यवस्थेसह अंथरून पांघरून आदी सोई- सुविधा व्यवस्थितपणे मिळाल्या पाहिजेत. भविष्यात या नागरिकांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती देणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून सर्व ती दक्षता घेण्यात यावी. नागरिकांची घरे, इतर मालमत्ता आदींचे नुकसान झाल्यास महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करावेत तसेच बाधितांना १०० टक्के मदत मिळेल याची दक्षता घ्यावी.

धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत जलसंपदा विभागाने पुरेशी आधीच माहिती द्यावी. आपत्ती काळात पावसाचे, पूरस्थितीच्या इशाऱ्यांवर लक्ष ठेऊन ते नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावीपणे काम करावे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांची तयारी करावी. वाहतूक कोंडी होणार नाही आणि रहदारी सुरळीत राहील यासाठी पोलीस प्रशासनाने काम करावे. मनपा हद्दीतील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू राहतील याची काळजी घ्यावी. बचाव कार्यासाठी एनडीआरएफ पथकाच्या सतत संपर्कात रहावे. तसेच बोटी, मदत साठा आदी तयार ठेवावे, असेही ते म्हणाले.

शहरातून पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्या वाहतात. या नद्यांच्या लगतच्या झोपडपट्ट्यात पुराचे पाणी येऊ नये म्हणून नदी सुधार प्रकल्पांना गती देणे आवश्यक असून भविष्यात सीमाभिंतींचे काम हाती घेणे गरजेचे आहे, आदी सूचनाही त्यांनी दिल्या.

आयुक्त श्री. सिंह यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. महानगरपालिकेचा पूर नियंत्रण कक्ष, जलसंपदा विभागाचा कक्ष, आपत्ती व्यवस्थापन कक्ष १ जूनपासून २४ तास ७ तास तत्त्वावर कार्यान्वित करण्यात येणार आहे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग, अग्निशमन बाबत फायर क्रू अशी नवीन संकल्पना सुरू केली आहे. हवामान विभागाचा इशारा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली आहे. तात्पुरते निवारा केंद्र निश्चित केली असून असून तेथे आवश्यक त्या सुविधा, अन्न, निवास व्यवस्थेसाठी अंथरूण, पांघरूण पुरविण्याचे नियोजन केले आहे. पूरपरिस्थिती असलेल्या काळात तेथील रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक लोकप्रतींनी सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त श्री. सिंह यांनी केले.

आपत्ती व्यवस्थापनासाठी १ हजार कोटी रुपयांची मागणी केली असून त्यापैकी राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून ५७० कोटी रुपये पवना नदी पूर शमन उपाययोजनांसाठी मिळावे म्हणून प्रस्ताव पाठविला आहे. यातून नैसर्गिक नाल्यांचे पुनुरूज्जीवन, पुराच्या धोका कमी करणे, नागरिकांच्या जीविताचे, मालमत्ता तसेच पायाभूत सुविधांचे संरक्षण, पर्जन्यजल वाहिन्या, सांडपाणी वाहिन्यांची सुधारणा करणे तसेच आदी समग्र पूरनियंत्रण उपाययोजना राबविण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.

यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री. आव्हाड, उपायुक्त श्री. बांगर यांनी पोलीस विभागाच्यावतीने वाहतुकीच्या अनुषंगाने, पर्यायी मार्ग तसेच अन्य नियोजनाची माहिती दिली.

जलसंपदा विभागाने त्यांचेकडील पूरनियंत्रण कक्ष, पाणी सोडण्याबाबतचे नियोजन कसे करण्यात येते याची माहिती दिली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने नागरिकांच्या जीविताचे रक्षणाच्या अनुषंगाने करण्यात येणारी कार्यवाही व नियोजन आदींची माहिती दिली.

महानगरपालिकेतील उपायुक्तांनी त्यांच्या हद्दीतील नियोजनाची माहिती दिली. त्याचबरोबर विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले.

0000

- Advertisement -