Home बातम्या ऐतिहासिक मालदीवच्या अध्यक्षांची दादासाहेब फाळके चित्रनगरीला भेट

मालदीवच्या अध्यक्षांची दादासाहेब फाळके चित्रनगरीला भेट

0
मालदीवच्या अध्यक्षांची दादासाहेब फाळके चित्रनगरीला भेट

मुंबई, दि. 4 : मालदीव प्रजासत्ताकचे अध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांच्यासह शिष्टमंडळाने गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे भेट दिली. या भेटीदरम्यान चित्रनगरीमधील बॉलिवूड पार्क आणि क्रोमा स्टुडिओ पाहून उपस्थित शिष्टमंडळ प्रभावित झाले.

मालदीवच्या अध्यक्षांसह शिष्टमंडळात मालदीवचे वित्तमंत्री इब्राहिम अमीर, आर्थिक विकास मंत्री फैय्याज इस्माईल, भारताचे उच्चायुक्त मुनू महावार यांचा समावेश होता.

या भेटीदरम्यान चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार, सह व्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे,चित्रनगरीचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बॉलिवूड पार्कमध्ये मराठी, हिंदी आणि मालदीव भाषेतील नृत्याबरोबर कॉमेडी शो आयोजित करण्यात आला होता. क्रोमा स्टुडिओमध्ये चित्रीकरणापूर्वी आणि नंतर कसे बदल, इफेक्ट्स केले जातात याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखविण्यात आले. या शिष्टमंडळाने ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेच्या सेटला भेट दिली.

मालदीवमध्ये पर्यटन आणि उद्योगाच्या संधीबरोबरच चित्रीकरणासाठी आवश्यक असणारी अनेक स्थळे असून ती भारतीय निर्मात्यांच्या पसंतीचे चित्रीकरण स्थळ असल्याचे श्री. भीमनवार यांनी यावेळी सांगितले.

००००

श्रीमती वर्षा आंधळे/विसंअ/4.8.2022