सोलापूर : केंद्र सरकारच्या वन, पर्यावरण व जलवायू परिवर्तन मंत्रालयातर्फे माळढोक अभयारण्यासंदर्भात अध्यादेश प्रसिद्ध केला आहे. अभयारण्य क्षेत्रात कोणता भाग येतो, तिथे कोणत्या प्रकारचे उद्योग करता येतील, नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. याचे पर्यावरण प्रेमींनी स्वागत केले असून नागरिकांनी अटीचे पालन करावे असे आवाहन केले आहे. आपला परिसर माळढोक पक्ष्यासाठी अनुकूल असला पाहिजे, ही आता आपली जबाबदारी आहे.
पक्ष्यांना धोका निर्माण होऊ नये यादृष्टीने कुटीर उद्योग, गवताळ क्षेत्र, नैसर्गिक शेती करण्यात यावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत. माळढोकचा विचार करताना नागरिकांना यामुळे नुकसान होऊ नये अशा तरतुदी केल्या आहेत. इको सेन्सेटिव्ह झोनमधील क्षेत्रामध्ये काही परवानगीची गरज असल्यास जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वनविभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यासहित नऊ जणांची समिती नेमण्यात येणार आहे.
राजस्थानमध्येही माळढोकची संख्या कमी झाली आहे. आपल्या अभयारण्यात तो पुन्हा येऊ शकतो. माळढोकच्या या अभयारण्यात प्रदूषण होऊ नये याची खबरदारी घ्यावी. जैवविविधतेच्या संरक्षणाच्या दृष्टीने काही सूचना मांडण्यात आल्या आहेत. याचे तंतोतंत पालन करायला हवे. काही ठिकाणी अनधिकृतरित्या खाणी सुरु असल्यास त्या बंद व्हायला हव्यात, अशी अपेक्षा पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली.
यापूर्वी इको सेन्सेटिव्ह झोन मोठा होता. आता त्याची नेमकी सीमा निश्चित करण्यात आली आहे. सध्या या परिसरात माळढोक दिसत नसले तरी भविष्यात तो पुन्हा येऊ शकतो. यासाठी तेथील परिसर माळढोक पक्ष्यांसाठी अनुकूल असायला हवा. याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.
– डॉ. निनाद शहा, मानद वन्यजीव रक्षक
माळढोक हा सोलापूरची शान आहे. आपल्याकडे माळढोक पुन्हा मोठ्या संख्येने यायला हवा. माळढोकमुळे इतर जीवांनाही अभय मिळते. गवताळ रानाला महत्त्व नसल्याची मानसिकता आपल्याकडे आहे. यामुळे गवताळ रानाला आणखी महत्त्व प्राप्त होईल. तसेच नागरिकांच्या मनातील गवताळ रानाविषयीचे गैरसमज दूर होतील.
– भरत छेडा, प्रमुख, नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कल