माहिती व जनसंपर्क विभागातील  सुमित राठोड यांच्यावर अंत्यसंस्कार – महासंवाद

    - Advertisement -


    यवतमाळ, दि. १५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई येथे कार्यरत सहायक अधीक्षक सुमित हरिदास राठोड (वय ४५) यांचे शनिवारी विरार येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज यवतमाळ येथील मोक्षधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

    यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सुमित राठोड यांच्या निवासस्थानी जाऊन पार्थिवाचे दर्शन घेतले. तसेच त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

    सुमित राठोड हे मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी होते. सन २००८ मध्ये त्यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई येथे लिपिक पदावर नियुक्ती झाली होती. गेल्या १८ वर्षांपासून ते महासंचालनालयात कार्यरत होते. या कालावधीत त्यांनी विविध शाखांमध्ये जबाबदारीने आणि कुशलतेने कामकाज सांभाळले. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

    अंत्यसंस्कारप्रसंगी डॉ. टी.सी. राठोड, देवानंद पवार, राठोड परिवारातील सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवार, मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.

    यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने धाराशिवचे जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे आणि यवतमाळचे प्रभारी जिल्हा माहितीअधिकारी पवन राठोड यांनी पुष्पचक्र अर्पण करून दिवंगत सुमित राठोड यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना विभागाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वस्त केले.

    ००००

    - Advertisement -