Home ताज्या बातम्या माहुलमध्ये पुनर्वसन झालेले दरडग्रस्त पुन्हा मालाडला

माहुलमध्ये पुनर्वसन झालेले दरडग्रस्त पुन्हा मालाडला

0
माहुलमध्ये पुनर्वसन झालेले दरडग्रस्त पुन्हा मालाडला

म. टा. विशेष प्रतिनिधी

मालाड : दोन वर्षांपूर्वी मालाड पूर्व येथील पिंपरीपाड्यातील पालिकेने बांधलेली संरक्षक भिंत झोपड्यांवर कोसळून २२ जणांचे जीव गेले होते. चेंबूर, वाशीनाका येथे दरड कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर या दुर्घटनेची आठवण ताजी झाली आहे. या दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन माहुल गावामध्ये करण्यात आले होते. मात्र ८६पैकी ३६ कुटुंबे पुन्हा मालाडमध्ये परतली आहेत. माहुलमधील प्रदूषणाची समस्या, नोकरीधंद्यापासून दूर असलेले अंतर, मुलांच्या शाळेचे प्रश्न आणि लॉकडाउनमध्ये रोजगाराला बसलेला फटका अशा विविध कारणांमुळे त्यांनी पुन्हा मालाडमध्येच बस्तान बसवले आहे.

नैसर्गिक व मानवनिर्मित दुर्घटनानंतर जेव्हा पुनर्वसनाचा मुद्दा पुढे येतो, त्यावेळी त्या रहिवाशांना नजिकच्या भागात सामावून घेण्याची, त्यांच्या रोजगाराची तसेच मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीनेही विचार करण्याची निकड यानिमित्ताने पुन्हा स्पष्ट झाली आहे. मालाड येथील दुर्घटनेमध्ये घरातील प्रत्येक वस्तू गमावून बसलेल्या हरेश जाधव यांना त्या दुर्घटनेनंतर दोन महिन्यांनी माहुलमध्ये घरे मिळाले. मात्र तिथून मालाडला कामधंद्यानिमित्त येण्यासाठी लागणारा वेळ, अंतर आणि पैशाचाही प्रश्न होता. त्यामुळे काही दिवसांनी त्यांनी पुन्हा मालाड येथे जाण्याचा निर्णय घेतला. अशा दुर्घटनांनंतर तेथील रहिवाशांचा कलही लक्षात घ्यायला हवा. अनेकदा मिळते मदत तर स्वीकारा…अन्यथा मदत मिळणार नाही, अशी धास्ती रहिवाशांच्या मनात असते. प्रत्यक्ष पुनर्वसन झाल्यानंतर तेथील अनेक अडचणी लक्षात येतात. माहुलमध्ये ज्या ठिकाणी घरे दिली, तिथे वीज, पाणी, प्रदूषणाशी निगडित अनेक समस्या आहेत. आर्थिक क्षमता नसलेल्या अनेकांनी या समस्यांशी झुंज देत जगणे स्वीकारले. ज्यांना थोडा आधार मिळाला, त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी येथून पुन्हा मालाड, कांदिवली परिसरात जाण्याचा पर्याय स्वीकारल्याचे दि. का. पवार सांगतात.

घरांमध्ये पुन्हा पाणी

दोन वर्षांपूर्वी झालेल्या दुर्घटनेमध्ये ज्यांच्या घरात पाणी आले नव्हते, त्यांच्या घरांमध्ये बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने पाणी शिरले. स्थानिक लोकप्रतिनिधींनी रात्री दोन-अडीच वाजता या कुटुंबांची भेट घेतल्याचे येथील रहिवाशी सांगतात. ज्यांनी पुन्हा मालाड मध्ये जाण्याचा पर्याय स्वीकारला त्यांनी तिथेच भाड्याने घरे घेतली आहे.

अद्याप नुकसानभरपाई नाही

या दुर्घटनेमध्ये ज्या कुटुंबातील व्यक्ती दगावल्या त्यांना आर्थिक मदत मिळाली मात्र घरादाराचे, सामानाचे नुकसान झाले त्यांना कोणतीही मदत अद्याप मिळालेली नाही. ही मदत मिळावी यासाठी या रहिवाश्यांनी खेपा घातल्या मात्र करोना संसर्गाच्या काळामध्ये मदत मिळण्याची शक्यता पुन्हा मावळली. संसार वाहून गेलेल्या या रहिवाशी मिळेल ते काम करून गुजराण करत आहेत.

Source link