Home शहरे औरंगाबाद ‘मित्रांनो पावसाळ्यात काळजी घ्या’, बैलजोडी दगावलेल्या शेतकऱ्याचं भावनिक आवाहन

‘मित्रांनो पावसाळ्यात काळजी घ्या’, बैलजोडी दगावलेल्या शेतकऱ्याचं भावनिक आवाहन

सिल्लोड : औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यात शेत वखरताना बांधावरील विद्युत पोलच्या अर्थिंगमधून विजेचा धक्का बसल्याने बैलजोडी दगावली. सिल्लोड तालुक्यातील वांगी शिवारात गुरुवारी ही घटना घडली. ऐन पेरणीच्या दिवसात घडलेल्या या दुर्घटनेमुळे शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे. मात्र, या परिस्थितीही इतर शेतकरी मित्रांना काळजी घेण्याचं आवाहन शेतकरी सर्जेराव पाटील यांनी केलं आहे. सोशल मीडियावर त्यांच्या दगावलेल्या बैलाचे फोटो व्हायरल झाले आहेत. 

भराडी येथून जवळच असलेल्या वांगी येथील शेतकरी सर्जेराव पाटील भागाजी पाटील साळवे यांच्या गट क्रमांक 251 मधील शेतात वखरणीचे काम सुरू होते. शेतातील वखरणीचे काम सुरू असताना बांधावरुन वखर वळवताना विद्युत पोलच्या अर्थिंगला स्पर्श झाल्याने विजेचा करंट बसून बैलजोडी दगावल्याची दु:खद घटना घडली. सुदैवाने वखराचे जू लाकडी असल्याने मनुष्यहानी टळली. महसूल विभागाच्यावतीने आर.पी. माने यांनी या घटनेचा पंचनामा केला असून यात 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र, आपली बैलजोडी दगावल्याने सर्जेराव पाटील यांच्यासह कुटुबीयांना अतोनात दु:ख झाले आहे. मात्र, या दु:खातून सावरताना, अशी दुर्घटना इतर शेतकऱ्यांच्या बाबतीत घडू नये, यासाठी सर्जेराव पाटील यांनी पाऊस काळात शेतातील कामे करताना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, जी वेळ आमच्यावर आली ती कुणावरही येऊ अशी प्रार्थनाही त्यांनी केली. सर्जेराव यांच्या शेतातील बैल दगावल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.