मिमी

मिमी
- Advertisement -


‘इंग्लिश विंग्लिश’, ‘डिअर जिंदगी’, ‘हिंदी मिडीयम’, ‘१०२ नॉट आऊट’ या कलाकृतींमध्ये लक्ष्मण उतेकर या छायांकनकाराची ‘नजर’ प्रेक्षकांनी अनुभवली. या चित्रपटांच्या छायांकनासह मराठीतल्या ‘टपाल’, ‘लालबागची राणी’ आणि हिंदीत ‘लुकाछुपी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केल्यानंतर उतेकर यांचा ‘मिमी’ हा चित्रपट आला. छायांकनकारात दडलेल्या परिपक्व दिग्दर्शकाचं दर्शन ‘मिमी’हा चित्रपट घडवतो. या चित्रपटात भावभावनांचे विविध कंगोरे आपल्या नजरेस पडतात. सुरुवातीपासून शेवटापर्यंत हा चित्रपट आपल्याला गुंतवून ठेवतो. मार्मिक कथा, रंजक पटकथा, संतुलित नाट्य, दिग्दर्शकाची पकड आणि कथेशी एकरूप झालेलं गीत-संगीत यामुळे ‘मिमी’ हा पठढीतल्या चित्रपटांहून वेगळा ठरतो.

एक काळ असा होता, जेव्हा पला देश पाश्चात्त्य देशांसाठी सरोगसीचं केंद्रस्थान बनला होता. सरोगसी व्यवसाय झाला होता. ‘मिमी’मध्ये हीच गोष्ट भावभावनांच्या अविष्कारातून मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं केला आहे. २०११ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या ‘मला आई व्हायचंय’ या मराठी चित्रपटावर ‘मिमी’ बेतलेला आहे. त्याची मूळ कथा समृद्धी पोरे यांची आहे. मराठी चित्रपटाचं हिंदी रूपांतर लक्ष्मण आणि रोहन शंकर यांनी केलं आहे. हे करताना कथानकाच्या मूळ मर्माला कुठंही धक्का लावलेला नाही. गोष्ट अधिक फुलवत ती व्यापक करण्यात आली आहे. चित्रपटाची गोष्ट सुरू होते, उत्तर प्रदेशातल्या एका गावात. इथं ‘सरोगसी’साठी तयार असणाऱ्यांची कमी नाही. सुरुवातीच्या काही मिनिटांतच ‘सरोगसी’ला व्यवसाय बनवणाऱ्या व्यवस्थेला दिग्दर्शकानं चपराक लगावली आहे. जॉन (एडन व्हायटॉक) आणि समर (एवलीन एडवर्ड्स) हे अमेरिकी जोडपं त्यांच्या बाळासाठी सरोगेट आईच्या शोधात भारतात आलं आहे. त्यांचा चालक भानू (पंकज त्रिपाठी) याला हे कळल्यावर तो त्या जोडप्याला मिमीपर्यंत (कृती सेनन) घेऊन जातो. उत्तम नर्तिका असलेल्या मिमीला अभिनेत्री व्हायचं आहे. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती सरोगेट आई होण्याचं स्वीकारते; पण जॉन आणि समर सगळं अर्ध्यावरच सोडून अमेरिकेला निघून जातात. पुढं मिमी बाळाला कसा जन्म देते आणि स्वतःसह, कुटुंब आणि समाजाशी कशी झगडते, अशी चित्रपटाची कहाणी आहे. भावनिक नाट्याला विनोदाची जोडही उत्तम.

या चित्रपटात कृती सेननमध्ये दडलेल्या सक्षम अभिनेत्रीचं दर्शन घडतं. तिच्या सोबतीला असणाऱ्या सई ताम्हणकरचा अनुभव तिच्या कामातून झळकतो. चित्रपटाची एक जमेची बाजू म्हणजे पंकज त्रिपाठी. त्याचा अभिनय नेहमीसारखाच दाद मिळवणारा. समरची भूमिका साकरणाऱ्या एवलीन एडवर्ड्सचं कामही उत्तम. ए. आर. रहमान यांचं संगीत आणि अमिताभ भट्टाचार्य यांच्या गाण्यांनी कथेला परिपूर्णता दिली आहे. आवर्जून पाहावी अशी ही कलाकृती आहे.

मिमी

निर्मिती ः मॅडडॉक फिल्म्स, जिओ स्टुडिओ

दिग्दर्शक ः लक्ष्मण उतेकर

कथा-पटकथा ः लक्ष्मण उतेकर, रोहन शंकर

कलाकार ः कृती सेनन, पंकज त्रिपाठी, सई ताम्हणकर, मनोज पाहवा, सुप्रिया पाठक

छायांकन ः आकाश अग्रवाल

संकलन ः मनीष प्रधान

संगीत ः ए. आर. रेहमान

ओटीटी ः नेटफ्लिक्स

दर्जा ः तीन स्टार



Source link

- Advertisement -