मिलेटचे महत्त्व लक्षात घेऊन महोत्सवाची व्याप्ती राज्यभर वाढविणार – पणन मंत्री जयकुमार रावल – महासंवाद

मिलेटचे महत्त्व लक्षात घेऊन महोत्सवाची व्याप्ती राज्यभर वाढविणार – पणन मंत्री जयकुमार रावल – महासंवाद
- Advertisement -

मुंबई, दि. २०: राज्यात ज्वारी, बाजरी, नाचणी ही प्रमुख तृणधान्ये (मिलेट्स) आहेत. कमी पाण्यावर येणारी तसेच पर्यावरणपूरक असण्याबरोबरच आरोग्यासाठी लाभदायी असणाऱ्या मिलेट्सना शेतातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने मिलेट्स महोत्सवाचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने मिलेट्स महोत्सव राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगत या महोत्सवास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

बोरीवली पश्चिम येथील कोरा केंद्र मैदानावर आयोजित तिसऱ्या मिलेट्स महोत्सवाचे उद्घाटन मंत्री रावल यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार मनीषा चौधरी, नगरसेवक शिवानंद शेट्टी, कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सर-व्यवस्थापक विनायक कोकरे आदी उपस्थित होते. २२ मार्च २०२६ पर्यंत हा महोत्सव नागरिकांसाठी खुला असणार आहे.

राज्यात ‘महाराष्ट्र श्री अन्न (मिलेट) अभियान’

पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले, जगभरातील तृणधान्य लागवडीला प्रोत्साहन मिळावे, या भूमिकेतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने संयुक्त राष्ट्रात २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करावे, असा ठराव मांडला होता. या ठरावाला ७१ सभासद देशांनी पाठिंबा दिल्याने संयुक्त राष्ट्राच्या वतीने जगभरात २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) २०२६ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. या उपक्रमाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासन कृषी आणि अन्न प्रणालीतील महिलांचे अमूल्य योगदान, सक्षमीकरण आणि त्यांच्यासमोरील आव्हानांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. या निमित्ताने राज्यात ‘महाराष्ट्र श्री अन्न (मिलेट) अभियान’ सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

बदलत्या जीवनशैलीमुळे जगभरातील लोकांना स्थूलपणाचा तसेच त्यासोबत येणारा उच्च रक्तदाब, मधुमेहासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यावर ‘पौष्टिक तृणधान्य’ रामबाण उपाय ठरू शकतात. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षामुळे देशभर तृणधान्याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. विशेषतः सामान्य ग्राहकांमधूनही मागणी वाढत आहे. यामुळे राज्यात तृणधान्यापासून उत्पादने तयार करणारे नवउद्योजक मोठ्या प्रमाणात तयार झाले आहेत. या उत्पादनांची प्रसिद्धी, ग्राहकांमध्ये जागरुकता व बाजार साखळी तयार करणे यावर भर देण्यात येणार असल्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

मॅग्नेट अंतर्गत एकात्मिक मूल्य साखळीचा विकास

आशियाई विकास बँक (एडीबी) अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत, राज्यातील प्रमुख १५ फलोत्पादन पिकांसाठी उत्पादन ते ग्राहकांपर्यंत वितरण अशा एकात्मिक मूल्य साखळीचा विकास करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

मॅग्नेट प्रकल्पाच्या विस्तारीत टप्पा २.० अंतर्गत, पौष्टीक घटकावर विशेष भर देण्यात येणार असून फलोत्पादन पिके तसेच मिलेट उत्पादनांचा वापर वाढविणे, मूल्यवृद्धी व व्यवसायवृद्धीसाठी ब्रॅण्डिंग व प्रोत्साहन उपक्रमांद्वारे महाराष्ट्र शासनामार्फत आशियाई विकास बँकेचे सहकार्याने विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषी पणन मंडळातर्फे दरवर्षी विविध फळ व धान्य महोत्सवांचे एकत्रितपणे आयोजन केले जाते. तथापि असे एकत्रित महोत्सव न घेता, मिलेटचे आरोग्यविषयक असलेले महत्व व मिलेट उत्पादकांना एक व्यासपीठ देण्याच्या दृष्टिकोनातून गतवर्षीपासून स्वतंत्रपणे मिलेट महोत्सवाची सुरूवात करण्यात आली आहे. मागील वर्षी पुणे शहरात यास चांगला प्रतिसाद मिळाल्याने या वर्षी मुंबईत आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात राज्यभरातून उत्पादक, प्रक्रियादार, नवउद्योजक सहभागी झाले असून या अभियानाची व्याप्ती वाढविण्याकरिता पणन मंडळामार्फत आगामी काळात राज्यात पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, लातूर या ठिकाणी मिलेट महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, असे मंत्री रावल यांनी यावेळी जाहीर केले.

आमदार मनिषा चौधरी यांनी महोत्सवात सहभागी महिला शेतकरी तसेच उत्पादकांचे कौतुक केले. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सर्वांनी मिळून विशेषतः महिला शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी काम करूया, असे सांगून स्थानिक नागरिकांनी महोत्सवास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले.

कार्यकारी संचालक संजय कदम यांनी प्रास्ताविकाद्वारे महोत्सव आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. तर, सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांनी महोत्सवास पाठबळ दिलेल्या सर्वांचे आभार मानले.

०००

बी.सी.झंवर/विसंअ

- Advertisement -