हायलाइट्स:
- दिलीप कुमार यांच्या निधनाने धक्का बसला- शगुफ्ता अलींनी व्यक्त केली प्रतिक्रिया
- दिलीप कुमार यांनी शगु्फ्तांच्या कुटुंबाला संकटकाळात केली होती मदत
- वडिलांचे लंडनमध्ये नेऊन केले होते ऑपरेशन, वैद्यकीय उपचारांचा खर्चही केला
शगुफ्ता अली यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ३८ वर्षांपूर्वी दिलीप कुमार त्यांच्या आयुष्यात देवदूत म्हणून आले. त्यांनी मदत केली होती. शगुफ्ता यांनी मुलाखीतमध्ये पुढे सांगितले, ‘कौटुंबिक जबाबदा-यांमुळे मी लग्न केले नाही. कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी मी काम करायला सुरुवात केली. त्यावेळी मी १७ वर्षांची होते. त्याकाळात माझ्या वडिलांवर लंडनमध्ये हार्ट सर्जरी करायची होती. त्यावेळी दिलीप कुमार यांनी आम्हाला मदत केली. ते माझ्या वडिलांना घेऊन लंडनला गेले. इतकेच नाही तर त्यांनीच ऑपरेशनचा संपूर्ण खर्च केला.’
दिलीप अंकल यांची कायम ऋणी राहीन
शगुफ्ता यांनी पुढे सांगितले, ‘माझे वडिल आणि दिलीप कुमार जवळचे मित्र होते. त्यामुळेच दिलीप काकांनी वडिलांच्या वैद्यकीय उपचारांचा सर्व खर्च उचलला होता. ही गोष्ट ३८ वर्षांपूर्वीची आहे. त्यावेळी दिलीप अंकलनी माझ्या वडिलांच्या उपचारांसाठी सहा लाख रुपये पाठवले होते. त्यानंतर माझ्या वडिलांवरील ऑपरेशन यशस्वी झाले. दोन महिने ते तिथे राहिले आणि त्यानंतर परत आले. मी आणि माझी आई दिलीप कुमार यांची आजन्म ऋणी आहे. त्यांनी आमच्या कुटुंबाला कायमच मदत केली.’
कुटुंबाला केली आर्थिक मदत
‘दिलीप अंकलनी केवळ आमच्या वडिलांनाच मदत केली नाही तर मला सिनेमात काम मिळवून देण्यासाठीही मदत केली,’ असे शगुफ्ता यांनी मुलाखतीमध्ये सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, ‘ऑपरेशन झाल्यामुळे माझे वडील काम करू शकत नव्हते. त्यावेळी दिलीप कुमार यांनी आमच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली. घरात मीच मोठी असल्याने कुटुंबाची जबाबदारी मी घेत काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मी दिलीप कुमार यांच्याकडे गेले.’

मला काम मिळवून दिले…
शगुफ्ता यांनी आपल्या मुलाखतीमध्ये पुढे सांगितले, ‘ मी दहावीची परीक्षा दिली आणि त्यानंतर तडक दिलीप अंकल यांच्याकडे गेले. त्यांनी मला लग्न करण्याचा सल्ला दिला. परंतु आई-वडिलांची आणि कुटुंबाची काळजी मला घ्यायची असल्याचे त्यांना सांगितले. तेव्हा त्यांनी मला सिनेमात काम मिळवून दिले. ‘कानून अपना अपना’ या सिनेमात मला त्यांच्यामुळेच काम मिळाले. त्याआधी मी एक तेलुगु सिनेमात काम केले होते… ‘कानून अपना अपना’ नंतर आणखी एका सिनेमात दिलीप अंकलमुळे काम मिळाले. त्यानंतर मग मला सिनेमांत काम मिळत गेले…’