आनंद, प्रतीक्षा आणि ओटीटी
‘मी वसंतराव’ चित्रपट ‘कान’ महोत्सवासाठी निवडला गेला. या विषयी राहुल म्हणतात, ‘हा अवर्णनीय आनंद आहे. आजोबा, त्यांची गायकी हा जिव्हाळ्याचा विषय आहे. ही कलाकृती म्हणजे त्यांच्या जीवनकार्याला आदरांजली आहे. पहिला आणि जीव ओतून केलेला हा प्रयत्न आहे. गेलं वर्षभर काही झालं नाही; पण चित्रपट राज्य सरकारकडून ‘कान’साठी जात आहे, हे ऐकून फार आनंद वाटला. हुरूप आला. प्रदर्शनाबद्दल बोलायचं, तर पूर्ण क्षमतेनं चित्रपटगृहं सुरू झाल्यास, अगदी उद्याही तो प्रदर्शित करायला आवडेल. ही कलाकृती चित्रपटगृहासाठी तयार झालेली आहे.’ ओटीटीवर प्रदर्शित न करण्याबाबत ते म्हणाले, ‘निर्मात्यांचीही काही गणितं असतात. सुदैवानं प्रायोजक, प्रस्तुतकर्ता आणि निर्माते यांनाही तो चित्रपटगृहांतच प्रदर्शित व्हावा असं वाटतंय. भाईकाका (पु. ल. देशपांडे) म्हणायचे, ‘मोठी माणसं जात नसतात, ती संगीतरूपानं चिरंतन राहतात.’ मला वाटतं, ही त्याचीच पावती आहे. हा चित्रपट नाना पाटेकर यांनीही पाहिला. ‘तू संगीत चांगलं करशील याची खात्री होती; पण नट म्हणूनही चांगला वावरला आहेस,’ ही त्यांची प्रतिक्रिया हुरूप वाढविणारी आहे.’
आजोबांचा गेटअप आणि मी
मोठ्या पडद्यावर आजोबांची भूमिका तुम्हीच साकारायचं ठरलं होतं का, असं विचारताच ते म्हणाले, ‘सुरुवातीलाच दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीला मी हा चित्रपट करावा का, हे विचारलं होतं. निपुणसोबत मी ‘संगीत मानापमान’, ‘संगीत संशयकल्लोळ’ आणि ‘संगीत सौभद्र’ ही नाटकं केली. चित्रपटाचं काम सुरू झाल्यावर मी निपुणला ही भूमिका करण्याबाबत स्पष्टपणे विचारलं होतं. मी करू शकणार नसेल, तर तसं सांग, असंही त्याला म्हणालो होतो. ही भूमिका तूच केली पाहिजेस आणि करू शकतोस, असं त्यानं सांगितल्यावर मला हायसं वाटलं. ‘बालगंधर्व’ चित्रपटात जेव्हा रवी जाधव यांनी मला केशवराव भोसलेंच्या भूमिकेसाठी विचारणा केली, तेव्हाही मी हा प्रश्न त्यांना विचारला होता. गायक म्हणून एखादी गोष्ट आपण चांगली मांडू शकतो, हे माहीत आहे. हे क्षेत्र मात्र पूर्णपणे नवं आहे. नाटक आणि चित्रपट ही वेगळी माध्यमं आहेत. प्रामाणिक प्रयत्न करणं माझ्या हाती होतं, मी तेच केलं. मी आतापर्यंत हा चित्रपट जितक्या वेळा पाहिला, तेव्हा मला पडद्यावर आजोबाच दिसले.
संगीत आणि दिग्दर्शन
चित्रपटाचं संगीत आणि दिग्दर्शन याबाबत राहुल म्हणाले, ‘आजोबांचं गाणं मी एवढं ऐकलंय, की ९९ टक्के रेकॉर्डिंग मला पाठ आहेत. मी जेव्हा गाणं सुरू केलं, तेव्हा भाईकाका म्हणाले होते, ‘आता वसंता नाही, कुमार नाही, तेव्हा तू कॅसेटला गुरू मान, त्यांचं गाणं ऐक, त्यातून तुला वाट मिळेल. मी उदंड ऐकलं. वडिलांनी विविध ठिकाणी फिरून खूप रेकॉर्डिंग गोळा केल्या होत्या. आजोबांचं पूर्ण आकलन होणं अवघड आहे; त्यामुळे कोणत्या पद्धतीनं एखादी गोष्ट ते गातील, सादर करतील याचा अंदाज आणि अनुभूती घेत, ‘बहुधा असं करतील’, अशा बैठकीनं मी गाणी केली. नागपूरला चित्रीकरण करत असताना एक गाणं तिथंच, एका दिवसात आम्ही तयार केलं. त्याची चाल निपुणला आवडली नाही. मी मेकअप करताना दुसरी चाल बांधली, ती त्याला आवडली. एका गझलेसाठी सात चाली बांधल्या, त्यातली त्याला एक आवडली. निपुणचं काम अतिशय शांत-संयमी आहे. चित्रीकरणाच्या ६२ दिवसांत एक-दोनदाच त्यानं उत्तम झालंय असं म्हणत दाद दिली. हा चित्रपट निपुणच करू शकतो, असंच मी म्हणेन.’
दडपण नव्हे; शोध
वसंतरावांचा नातू म्हणून त्यांच्या गायकीचा वारसा पुढे नेण्याचं आणि स्वतंत्र गायक म्हणून दडपण येतं का, असं विचारताच राहुल म्हणतात, ‘सुरुवातीला मी कुमारजी एके कुमारजी असा होतो. भाईकाका माझं गाणं ऐकायला घरी यायचे. आधी मी पिंपळखरे बुवांकडे शिकायचो आणि पुढे कुमारजींची गाणी गायला लागलो. एकदा आई भाईकाकांना म्हणाली, ‘हा सगळं कुमारजींचं गातो यात आनंद आहे; पण वसंतरावांचा नातू आहे, त्यांचंही काही तरी गावं.’ त्यावर भाईकाका म्हणाले होते, ‘त्याचा आवाज फुटू दे, आपोआप तो वसंताकडे घसरेल.’ ती किती द्रष्टे होते हे यावरून कळतं. वयानुसार पुढे माझा आवाज आजोबांच्या खूप जवळ गेला, त्यात फिरत यायला लागली. त्यांचं गाणं थोडं पेलायला लागलं. त्यांच्यातल्या उत्तुंग सादरकर्त्याचं दर्शन घडलं. त्यांच्या गायकीत भावगीत, ठुमरी, नाट्यगीत, गझल, लावणी असा प्रत्येक विषय किती मोठा होऊ शकतो हे कळतं. त्यांचा साहित्याचा खूप अभ्यास होता. म्हणूनच पुलं आणि ते मित्र होते. अनेक माणसं त्यांच्या या चौफेर असण्याचे किस्से सांगतात, तेव्हा हे सगळं आजोबांना केव्हा केलं हा संशोधनाचा विषय वाटतो. आजोबांच्या या पैलूंपैकी गाणं, अभिनय, नाटक यावर लक्ष केंद्रित करू आणि इतर गोष्टी कानावर आहेत त्या तशाच राहू देऊ, असं मी ठरवलं. आजोबांचं जे दर्शन मला घडलं त्याचा मी मागोवा घेत आहे.’
रिअॅलिटी शो आणि संघर्ष
रिअॅलिटी शो, नवोदितांना मिळणारं व्यासपीठ याबाबत राहुल म्हणतात, ‘शास्त्रीय संगीतावर रिअॅलिटी शो का होत नाही, असा माझा प्रश्न आहे. यापूर्वी प्रयत्न झाला; पण तो चालला नाही. मनोरंजन म्हणून जेव्हा तुम्ही या सगळ्याकडे पाहता, तेव्हा टीआरपी वगैरेचा विचार करावा लागतो. मी परीक्षक म्हणून खूप रोखठोक बोलायचो. तेव्हा मला सांगण्यात आलं, की एखाद्या गायकाचं सादरीकरण पाहणारी खूप मंडळी असतात. राहुल देशपांडेंनी यांना नाही म्हटलं, म्हणजे याला काहीच येत नाही, असा समज होऊ शकतो. नकारात्मक गोष्टही सकारात्मक पद्धतीनं सांगा. मला ते पटलं; मात्र या कार्यक्रमात ज्या ‘स्टोरी’ बनवल्या जातात, ते गायक म्हणून मला पटत नाही. एखाद्याची परिस्थिती हा त्याच्या गाण्याचा निकष ठरत नाही. आयुष्यात खूप मोठा संघर्ष किंवा परिस्थिती चांगला नाही, तरच चांगला गायक वा गायिका होते, अशी काही प्रतिमा जाऊ नये. गाण्याचाही एक स्ट्रगल असतो. रियाझ सुरू करतो तिथून हा स्ट्रगल सुरू होतो. हे करणारी मुलंही खूप कमी आहेत. मला क्लास काढून गायकीचा शिक्षक व्हायचं नाही. शिकवावं वाटतं त्यांना मी शिकवतो. अनेक पालक माझ्याकडे यायचे. मुला-मुलीला अमुक शोमध्ये जायचंय म्हणून शिकवा, तुम्ही नाव सुचवलंत, तर तिथं संधी मिळेल, असं म्हणायचे. त्यावर मला हे जमणार नाही, असं मी सांगतो. आज शिकवलं आणि उद्या गाणं आलं असं होत नाही. रिअॅलिटी शोमुळं अनेकांना काम मिळतंय. याच व्यासपीठानं अवधूत, बेला, स्वप्नील, श्रेया अशी प्रतिभावान माणसं दिली. त्यांनी या व्यासपीठाचं सोनं केलं. तुम्ही त्याचा योग्य उपयोग केला, तर घडू शकता.’
म्हणून थांबलो…
पुढं काय करणार आहात, असं विचारताच राहुल म्हणतात, ‘सध्या चित्रपट प्रदर्शित करण्याची वाट पाहत आहे. मधल्या काळात काही सुचेल. मी संगीत नाटक करणं थांबवलं. गायक आहे, हे मी विसरू शकत नाही. संगीत नाटकाचे मी चारशे-साडेचारशे प्रयोग केले. आजच्या पिढीला ते कळावं हा हेतू होता. नाट्यगीतं मैफलीत गायची नसतात; कारण त्यामागे संदर्भ, प्रसंग असतात. ‘कट्यार…’, ‘बालगंधर्व’ हे चित्रपट आल्यावर नव्या पिढीला ते कळलं. मग मी नाटक करणं बंद केलं. नवं संगीत नाटक करायला आवडेल. गाण्याचं, अभिनयाचं असतं, तसं रंगभूमीचं एक वेड असतं.’
प्रेझेंटेबल असणं कधीही चांगलं; पण प्रेझेंटेबल होण्यासाठी गाण्याचं सत्त्व किंवा मूल्य कमी होणं किंवा गायकीवरून लक्ष वळणं योग्य नाही. स्क्रीनवर कसा वा कशी दिसेन, याचा अधिक विचार केला, तर गाणं बाजूला राहतं. म्युझिक व्हिडिओ करत असाल, तर तिथं अभिनय ठीक. गायक म्हणून गाताना तुम्ही अंतर्बाह्य त्या गाण्यातच असायला हवं.
– राहुल देशपांडे