Home ताज्या बातम्या मुंबईकरांना मिळणार अधिवेशनानंतर लोकलप्रवासाची मुभा ?

मुंबईकरांना मिळणार अधिवेशनानंतर लोकलप्रवासाची मुभा ?

0
मुंबईकरांना मिळणार अधिवेशनानंतर लोकलप्रवासाची मुभा ?

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

मुंबई लोकलमधून प्रवासाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांना येत्या आठवड्यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. लोकल प्रवासासाठी तीन टप्पे तयार करण्यात येत असून महिला आणि दिव्यांग प्रवाशांना लवकरच लोकल मुभा मिळण्याचे संकेत आहेत. तर सर्वांसाठी पावसाळी अधिवेशनानंतर लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहेत.

तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने लोकलमधील गर्दीमुळे करोना संसर्ग पसरण्याची भीती वारंवार व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे अतिशय दक्षतेने तीन टप्प्यांत लोकल प्रवासाची मुभा देण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात महिला आणि दिव्यांग प्रवासी, दुसऱ्या टप्प्यात ५० वर्षांखालील पुरुष आणि तिसऱ्या टप्प्यात सर्वांसाठी लोकल मुभा असे याचे स्वरूप असेल. यानुसार सर्वांसाठी लोकल सुरू करण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात येतील, असे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

मुंबईची वर्णी पहिल्या टप्प्यात लागूनही लोकल सुरू करण्यास महापालिका आणि राज्य सरकार तयार नाही. तूर्त तिसऱ्या टप्प्यातील निर्बंधांनुसार दैनंदिन व्यवहार सुरू आहेत.

महिला आणि दिव्यांग प्रवाशांचे होणारे प्रवास हाल लक्षात घेता त्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याचा निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मात्र, येत्या आठवड्यात लोकल मुभा देण्याच्या निर्णयाबाबत मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याशी संपर्क साधला असता महिला आणि दिव्यांग प्रवाशांना परवानगी देण्याबाबत सध्या कोणतेही नियोजन नाही, असे त्यांनी सांगितले.

आंदोलने टाळण्यासाठी प्रतीक्षा

दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन सरकारने घोषित केले आहे. करोना काळात प्रथमच सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवरून नागरिकांनी मोठी गर्दी करत रस्त्यावर येऊन संघर्षाला सुरुवात केली आहे. मंत्रालय परिसरात आंदोलने, अधिवेशनाला घेराव अशा घटना टाळण्यासाठी सर्वांसाठी सुरू असलेली लोकलबंदी या पुढेही कायम राहणार आहे, अशी चर्चा ही वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये रंगत आहे.

प्रवाशांचा उद्वेग

करोना नियंत्रणात आल्याने बसमधून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. मुंबई-पुणे, नाशिक, जालना, कोकण येथून प्रवासी वाहतुकीला मागणी वाढत आहे. यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून अधिकाधिक रेल्वेगाड्या सुरू करण्यात येत आहे. अशा स्थितीत मुंबईची जीवनवाहिनी अर्थात ‘मुंबई लोकल’ सामान्य मुंबईकरांसाठी बंद ठेवण्यात आली. यामुळे ‘लोकलबंदी आता पुरे’ अशी म्हणण्याची वेळ मुंबईकरांवर आली आहे.

Source link