मुंबईकरांसाठी मुलभूत आणि सकारात्मक कामांवर भर : पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबईकरांसाठी मुलभूत आणि सकारात्मक कामांवर भर : पालकमंत्री दीपक केसरकर
- Advertisement -

मुंबई, दि.22 : मुंबईकरांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांना सुविधा निर्माण करुन देण्यासाठी राज्य शासन वेगाने निर्णय घेत आहे. शहराचे सौंदर्यीकरण वाढविणे, अधिकाधिक मुलभूत सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करुन देणे यावर राज्य शासनाचा भर आहे. त्यामुळेच चर्नी रोड रेल्वे स्थानकाच्या दक्षिण बाजूकडील तिकीट खिडकी तात्पुरत्या स्वरुपात पूर्ववत सुरु करुन नागरिकांची गैरसोय दूर करण्यात आली आहे. यापुढील काळातही अशाच मुलभूत आणि सकारात्मक कामांवर आमचा भर असेल, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

चर्नी रोड स्थानकातील पूल प्रवाशांसाठी बंद करण्यात आल्याने  नागरिकांची गैरसोय होत होती. त्यातच गिरगावकडून चर्नी रोड स्टेशन मध्ये येणाऱ्या प्रवाशांना बरेच अंतर पायपीट करुन उत्तर दिशेला असणाऱ्या तिकीट खिडकीवर तिकीट काढण्यासाठी जावे लागत होते. आता याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात नवीन तिकीट खिडकी सुरू करण्यात आली. त्याचे उद्घाटन पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते आज झाले. यावेळी  स्थानिक लोकप्रतिनिधी, सहायक विभागीय रेल्वे व्यवस्थापक अवनीश वर्मा, रेल्वे पोलीस दलाचे विनीत खरब, रेल्वे आस्थापना विभागाचे अजय सिंग रजपूत, महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी घनश्याम वर्मा, उपमहाव्यवस्थापक सुनील मिश्रा, पोलीस उपायुक्त रवी सरदेसाई, जिल्हा नियोजन अधिकारी जी.बी. सुपेकर यांच्यासह रेल्वे, महानगरपालिकेचे विविध अधिकारी उपस्थित होते.

पश्चिम रेल्वेवरील चर्नी रोड स्थानकातील प्रवाशांसाठी बंद करण्यात आलेल्या पुलाची मागील आठवड्यात पालकमंत्री श्री. केसरकर यांनी पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी तातडीने  प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी, रेल्वे, मुंबई महानगरपालिका आदी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन कार्यवाही करण्यास सांगितले होते. आठच दिवसात येथे तात्पुरत्या तिकीट खिडकीची व्यवस्था होऊन आज ती प्रवाशांसाठी सुरु करण्यात आली.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले की, राज्य शासन आता सर्व घटकांसाठी वेगाने निर्णय घेत आहे. त्याचपद्धतीने मुंबईतील नागरिकांच्या अडचणी, तक्रारी दूर करण्याचा प्रयत्न आहे. यापूर्वीच आपण शहराच्या विविध भागातील पोलीस ठाणे, मंदिरे, रुग्णालये, कोळीवाडे आदी ठिकाणी भेटी दिल्या आहेत. तेथील समस्या समजावून घेतल्या आहेत. गिरगाव, दादर सारखे भाग मुंबईचे हृदय आहे. त्याबरोबरच सर्व भागातील नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आमचे प्राधान्य असल्याचे ते म्हणाले.

मुंबई शहराचे सौंदर्यीकरण करण्यावर अधिकाधिक भर दिला जात आहे. फिरते दवाखाने सुरु करण्याचा निर्णय घेऊन मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी आम्ही घेत आहोत.  त्यासाठी विविध संकल्पना राबवून त्या वेळेत मार्गी लागतील यासाठी राज्य शासन म्हणून तसेच रेल्वे, महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन समिती आदींच्या समन्वयाने प्रयत्न करत असल्याचे पालकमंत्री श्री. केसरकर यांनी स्पष्ट केले.

0000

- Advertisement -