मुंबईकर दिवसाच्या तुलनेत रात्री जास्त वीज खात असल्याचे समोर

- Advertisement -

 मुंबई :-

मुंबईकर दिवसाच्या तुलनेत रात्री 600-700 मेगावॅट जास्त वीज खात असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत मुंबईत सकाळी 9 ते 12 आणि संध्याकाळी 6 ते 10 या वेळेत विजेची जास्त मागणी नोंदविली जात होती. पण सध्या दिवसभर घरात बसून कंटाळा आल्याने आणि उकाडा वाढला असल्याने मुंबईकर रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात एसीचा वापर करायला लागले आहेत. त्यामुळे दिवसा 1700 मेगावॅटच्या घरात असलेली विजेची मागणी रात्री 11 ते पहाटे 4 या वेळेत 2400 मेगावॅट पर्यंत वाढत आहे.

मुंबईत अदानी इलेक्ट्रिसिटीचे तीस लाख वीज ग्राहक असून बेस्टचे बारा लाख, तर टाटा पॉवरचे सुमारे दहा लाख ग्राहक आहेत. या ग्राहकांच्या विजेच्या मागणीचे नियोजन कळवा येथील राज्य भार प्रेषण केंद्राकडून केले जाते. आतापर्यंत मुंबईकरांकडून सकाळी नऊनंतर तीन तास आणि संध्याकाळी सहानंतर चार तास विजेची सर्वाधिक मागणी नोंदली जात होती. तर रात्री दहानंतर सकाळी 8-9 वाजेपर्यंत विजेशी सर्वात कमी मागणी नोंदली जात होती. पण आता लॉकडाऊनमुळे मुंबईतील कॉर्पोरेट कार्यालय बंद असल्याने त्यांचे दिवसभर चालणारे एसी प्लांट बंद आहेत. तसेच उद्योग, दुकाने बंद असल्याने दिवसभराची मुंबईची विजेची मागणी 1600-1700 मेगावॅट पर्यंत खाली आली आहे. मात्र वाढलेल्या उकाड्यामुळे मुंबईकर रात्री दहानंतर एसी, पंखे, कुलर मोठ्या प्रमाणात सुरू करत आहेत त्यामुळे दिवसा कमी असलेली विजेची मागणी रात्री अकरानंतर 2400 मेगावॅटपर्यंत वाढत आहे. पहाटे चारनंतर ही मागणी टप्प्याटप्प्याने कमी होत आहे.

भार प्रेषण केंद्राची तारेवरची कसरत
लॉकडाऊनच्या आधी मुंबईची दिवसाची विजेची मागणी अडीच ते तीन हजार मेगावॅटच्या घरात असायची. तर रात्री यामध्ये घट होऊन दोन हजार मेगावॅट पर्यंत खाली यायची. त्यामुळे वीज पुरवठ्याचे सहज नियोजन करता येत होते. पण सध्या विजेच्या मागणीचा ट्रेंड बदलला असून दिवसा कमी आणि मध्यरात्री विजेच्या मागणीची मोठ्या प्रमाणात वाढ नोंदली जात आहे. त्यामुळे ही वाढीव मागणी पूर्ण करण्यासाठी भार प्रेषण केंद्राला कसरत करावी लागत आहे.

- Advertisement -