मुंबई, दि. १७: तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जपान अग्रेसर असून महाराष्ट्राच्या कृषी, अन्न प्रक्रिया, वैद्यकीय तसेच नागरी सुविधांच्या क्षेत्रात या आधुनिक तंत्रज्ञानाचे सहकार्य घेतले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृहावर मुंबईतील जपानचे वाणिज्यदूत यासुकाटा फुकाहोरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेतली. यावेळी खासदार राहुल शेवाळे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषि तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया, वैद्यक क्षेत्रातील पायाभूत सुविधा, नागरीविकास आदी विविध विषयांवर शिष्टमंडळाशी चर्चा केली.
या शिष्टमंडळात आर्थिक विषयातील तज्ज्ञ श्रीमती मोरी रेईको, राजकीय सल्लागार श्रीमती शिमाडा मेगुमी तसेच कुणाल चोणकर, विवेक कुलकर्णी या अधिकाऱ्यांचा समावेश होता.