मुंबईतील ‘त्या’ ग्रामस्थांनी घेतली ‘जेजे’मध्ये धाव; रायगडमधील दुर्घटनांतील ११ जणांवर उपचार सुरू

मुंबईतील ‘त्या’ ग्रामस्थांनी घेतली ‘जेजे’मध्ये धाव; रायगडमधील दुर्घटनांतील ११ जणांवर उपचार सुरू
- Advertisement -

म. टा. विशेष प्रतिनिधी,मुंबई

रायगड जिल्ह्यातील तळीये आणि पोलादपूर येथील गावांमधील दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांमधील ११ जखमींना शनिवारी जे.जे. रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यासोबत कुणीही नातेवाईक नसल्यामुळे मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. तळीये येथील आठ, तर पोलादपूर येथील तिघा जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नसल्यामुळे त्यांच्या उपचारपद्धतीसंदर्भात घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी कुणी घ्यायची, असा पेच उपस्थितांना पडला.

कल्याण, डोबिंवली, ठाणे येथे राहणाऱ्या तळीयेवासियांनी रुग्णालयामध्ये जखमींच्या मदतीसाठी धाव घेतली. या जखमींची प्रकृती स्थिर असली, तरी वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॅक्चर झाले असून काहीजणांना शस्त्रक्रियांची गरज भासणार आहे. त्यासाठी वैद्यकीय चाचण्या सुरूअसल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी सांगितले.

स्वाती कोंडाळकर (२१), रेश्मा कोंडाळकर (३८), स्वप्नील शिरवले (२६), संगीता कोंडाळकर (४१), नीलिमा सुतार (२८), सार्थक सुतार (४०), भारत सुतार (५०), नितेश सुतार (३२) यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुपारी पोलादपूर येथून आलेल्या तीन रुग्णांची नावे कळू शकलेली नाहीत. या रुग्णांवरील अस्थिव्यंगसंबंधी शस्त्रक्रियांसाठी लागणाऱ्या वैद्यकीय सामग्रीवर कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही, असे रुग्णालय प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

यातील काही रुग्णांच्या वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्या होत्या. तरुण मुलाच्या पायामध्ये संसर्ग झाल्यामुळे पाय कापावा लागू शकतो, असे सांगितल्यानंतर त्यांच्या मदतीसाठी उपस्थित मुंबईकर ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी आले. मात्र त्याचा जीव वाचवण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागणार आहे. मात्र तो कुणी घ्यायचा, हा पेच मदत करण्यासाठी गेलेल्या व्यक्तींपुढे संध्याकाळपर्यंत होता. गावामध्ये फोन करून ही माहिती देण्याचा प्रयत्न त्यातील काहींनी केला, मात्र तिथे सगळेच बंद झाल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही. संध्याकाळी काहींचे नातलग रुग्णालयामध्ये आले असून त्यांना रुग्णांच्या प्रकृतीसंदर्भात माहिती देता आल्याचे सांगण्यात आले.

शब्दही अपुरे

रुग्णालयामध्ये दाखल झालेले ग्लानीमध्ये असलेले जखमी सतत कुटुंबांची, मुलाबाळांची चौकशी करत होते. शुद्धीवर आल्यानंतरही त्यांना आपल्या घराची, माणसांची चिंता लागून राहिली होती. मुले कुठे असतील हा प्रश्न त्यांना छळत होता. विचारपूस करणाऱ्यांनी ‘तुम्ही काळजी घ्या,बरे व्हा…’ इतके बोलून त्यांना दिलासा दिला.

शस्त्रक्रिया पूर्ण

रेश्मा कोंडाळकर, स्वप्नील शिरवले यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आळ्या. रेश्माच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली, तर स्वप्नीलच्या डाव्या पायाचा तळवा आणि उजव्या पायाचा गुडघ्यापासून खालचा भाग काढला आहे. नीलिमा सुतार, संगीता कोंडाळकर, भारत सुतार यांना शस्त्रक्रिया विभागात नेण्यात आले आहे.

Source link

- Advertisement -