मुंबईत चंदीगढ,तर नाशिकमध्ये युपी; चित्रपटांच्या सेटसाठी करावी लागतेय तारेवरची कसरत

मुंबईत चंदीगढ,तर नाशिकमध्ये युपी; चित्रपटांच्या सेटसाठी करावी लागतेय तारेवरची कसरत
- Advertisement -


गेल्या दीड वर्षांपासून मनोरंजनसृष्टीच्या मानेवर करोनाची टांगती तलवार आहे. तरीही, अडचणीतून मार्ग काढत चित्रीकरणाचं काम सुरू आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर लादलेल्या निर्बंधांमुळे हे काम अधिकच आव्हानात्मक झालं आहे. योग्य लोकेशन शोधणं आणि सेट उभारणं यासाठी प्रोडक्शन डिझाइनर, कला दिग्दर्शक आणि टीम यांना कसरत करावी लागतेय.

‘जुग जुग जियो’ सिनेमातील साखरपुडा समारंभाच्या शानदार सीनचं चित्रीकरण चंदीगढमध्ये होणार होतं. चित्रीकरणस्थळ निश्चित झालं होतं. परंतु वरुण धवन, नीतू सिंग आणि दिग्दर्शक राज मेहता यांना करोनाचा संसर्ग झाल्यानं चित्रीकरण रद्द करावं लागलं. त्यामुळे आता मुंबईत चंदीगढला साजेसं स्थळ शोधलं जातंय. ‘आफत-ए-इश्क’ या चित्रपटाबाबतही असंच काहीस झालं आहे. सिनेमांचं चित्रीकरण लखनऊ आणि बनारसमध्ये होणार होतं. करोनाच्या फटक्यानं चित्रीकरण लांबणीवर पडलं आणि ठरवलेला युपीमधील मुहूर्त टळून गेला. परिणामी नाशिकमध्ये एका ठिकाणी युपीचा सेट उभारत तिथे चित्रीकरण करण्यात आलं. तर ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मुंबईत व्हर्च्युअल अय़ोध्या उभारली आहे. या सगळ्यात सर्वाधिक आव्हानांना समोर जावं लागतंय ते प्रोडक्शन डिझाइनर्स आणि कला दिग्दर्शकांना. कथानकाला साचेसं, दिग्दर्शकाला अपेक्षित असं उत्तम लोकेशन शोधण्यापासून ते सेट उभारण्यापर्यंत अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. त्यातही कलात्मकदृष्ट्या कोणतीही तडजोड न करता; हे काम त्यांना कमीत कमी वेळेत पूर्ण करावं लागतं.

अनेक अडचणींचा सामना
बहुचर्चित सिनेमांचे प्रोडक्शन डिझायनर तारिक उमर खान सांगतात, ‘सध्याच्या करोनाच्या दिवसांमध्ये चहुबाजूनी निर्बंध असताना काम करणं आणि कथनाला पूरक असं चित्रीकरण स्थळ शोधण्यापासून त्यावर सेट उभारण्यापर्यंत अनेक अडचणी येत असतात. ‘आफत-ए-इश्क’ या सिनेमासाठी आम्ही गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये लोकेशन पाहिलं होतं. कथानक लखनऊ आणि बनारसमध्ये घडणारं आहे. त्यामुळे आम्ही तेथील चित्रीकरण स्थळ निश्चित केलं. करोनामुळे काही दिवस चित्रीकरण पुढे ढकललं आणि त्यांनतर तर लॉकडाउनच लागल्यामुळे ठरवलेलं सर्वच रद्द करावं लागलं. अनलॉक प्रक्रिया सुरू झाली तेव्हा आम्ही नाशिकमध्ये युपीचा माहोल उभा करुन तिकडे चित्रीकरण पूर्ण केलं.’

शिमला टू नैनिताल
‘कॉलर बम’ या चित्रपटाचं चित्रीकरण शिमल्यामधील एका शाळेत करायचं ठरलं होतं. पण, जेव्हा चित्रीकरणासाठी चित्रपटाची टीम शिमल्याच्या दिशेने निघाली; तेव्हा टीममधील एका व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाल्याचं कळलं. त्यामुळे चित्रीकरण रद्द झालं. शिमल्यामधील चित्रीकरणाची परवानगीदेखील काही दिवसांनंतर संपली. शेवटी चित्रपटाच्या टीमनं नैनितालमध्ये शिमल्याला साजेसा असा सेट उभारला.

बजेट बिघडतं
सिनेमांच्या चित्रीकरणाचं बजेट अगोदरच ठरलेलं असतं. त्यानुसारच पूर्वतयारी केली जाते; पण अचानक अडचणी येतात तेव्हा बजेट बिघडतं. करोनाच्या दिवसात तर चित्रीकरणाची घडी पूर्णपणे विस्कटली होती. अनेक आठवडे चित्रीकरण पुढे ढकललं गेलं. त्यामुळे निर्मात्यांना लाखोंचं नुकसान सहन करावं लागलं. त्याचा परिणाम शेवटी सिनेमाच्या एकूण बजेटवरदेखील झाला. काहींनी आपला सिनेमा पूर्णपणे बंद केला तर काही कसेबसे या आर्थिक संकटातून बाहेर आले.

आर्ट विभागाला चित्रीकरणासाठी आवश्यक प्रॉप्सच्या वस्तू खरेदी कराव्या लागतात किंवा भाड्यानं आणाव्या लागतात. परंतु, लॉकडाउनमुळे ते कठीण झालं आहे. गेल्या वर्षीच्या मोठ्या लॉकडाउनमध्ये अनेक प्रॉप्स दुकानात पडून असल्यानं वापरण्यायोग्य राहिली नव्हती. परिणामी अधिकचा खर्च करुन नव्यानं त्या बनवाव्या लागल्या. यामध्ये अनेक दिवस गेले. दिवस वाढत असल्यानं आर्थिक गणित बिघडत होतं.
– शिवांगी सिंह, कला दिग्दर्शक



Source link

- Advertisement -