Home ताज्या बातम्या मुंबईत ड्रोनविरोधी तंत्रज्ञान अत्यावश्यक

मुंबईत ड्रोनविरोधी तंत्रज्ञान अत्यावश्यक

0
मुंबईत ड्रोनविरोधी तंत्रज्ञान अत्यावश्यक

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

कमी उंचीवरून हल्ला करणारे ड्रोन हे आता पुढील मोठे आव्हान ठरणार आहे. अशा ड्रोनशी सामना करणारे तंत्रज्ञान उपलब्ध असून मुंबईसारख्या शहरात हे ‘ड्रोनविरोधी’ तंत्रज्ञान असणे अत्यावश्यक आहे, असे मत ड्रोनविरोधी तंत्रज्ञान क्षेत्रातील कार्यरत कमांडर (निवृत्त) समीर मित्तल यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी व्यक्त केले.

जम्मू हवाईतळावर शनिवारी मध्यरात्री ड्रोनद्वारे दोन बॉम्बस्फोट करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर मित्तल यांच्याशी संवाद साधण्यात आला. नौदलातील २४ वर्षांच्या सेवेनंतर मित्तल यांनी स्वत:ची ड्रोन तंत्रज्ञानसंबंधी कंपनी सुरू केली आहे. ‘या प्रकारचा हल्ला सर्व प्रकारच्या पारंपरिक सुरक्षा यंत्रणांच्या पलीकडे जाऊन करता येतो. मुख्य म्हणजे ड्रोन हे सर्वत्र उपलब्ध आहेत. कुठूनही ते खरेदी करता येतात किंवा मिळवता येतात. त्यामुळेच असा हल्ला हा पुढील पिढीतील नवी युद्धपद्धती असून ते एक मोठे आव्हान आहे,’ असे ते म्हणाले.

जम्मूतील हल्ल्यात पाच किलो स्फोटकांचा वापर करण्यात आल्याचे बोलले जात आहे. एवढ्या वजनाची स्फोटके घेऊन ड्रोनचा वापर करणे शक्य आहे का, असे विचारले असता ते म्हणाले, ‘ड्रोनच्या वजनाच्या तीनपट स्फोटके वाहून नेता येतात. त्यानुसार १५ किलोचे ड्रोन तयार करणे फार अवघड नाही. बाजारात यासंबंधीची सामुग्री मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. ती खरेदी करून जुळवून ड्रोन तयार करता येऊ शकते. हे ड्रोन ५०० फुटांपेक्षा कमी उंचीवरूनदेखील उडवता येते. त्याची उड्डाण क्षमता जेमतेम चार ते पाच किमी असू शकते. त्यानुसार हल्ल्याच्या ठिकाणी येऊन कमी उंचीवरून ड्रोन उडवून हल्ला करता येऊ शकतो व हे एक मोठे आव्हान आहे.’

मागोवा घेणे शक्य

ड्रोनचा शोध घेणारी रेडिओ फ्रिक्वेन्सी, इलेक्ट्रो ऑप्टिकल, कमी उंचीवरील व धीम्या गतीने जाणाऱ्या ड्रोनचा शोध घेणारी रडार उपलब्ध आहेत. ड्रोनचा शोध लागला की, ते पाडण्यासाठीचे तंत्रज्ञानदेखील उपलब्ध आहे. शत्रू कसा आहे, नेमकी भीती कुठल्या प्रकारची आहे, हल्ल्याचे ठिकाण कुठे आहे, भौगोलिक रचना आदी घटकांनुसार ही यंत्रणा विकसित करता येते. हे तंत्रज्ञान थेट भारतात नसले तरी ते आयात करता येण्याजोगे आहे. त्यादृष्टीने आता सुरक्षा कवच बळकट करावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

Source link