Home ताज्या बातम्या मुंबईत दुधामध्ये जीवघेणी भेसळ; पोलिसांनी ठोकल्या चौघांना बेड्या

मुंबईत दुधामध्ये जीवघेणी भेसळ; पोलिसांनी ठोकल्या चौघांना बेड्या

0
मुंबईत दुधामध्ये जीवघेणी भेसळ; पोलिसांनी ठोकल्या चौघांना बेड्या

म. टा. खास प्रतिनिधी,

नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्या फोडून, त्यामध्ये अस्वच्छ पाणी मिसळून भेसळयुक्त दूध विकणाऱ्या चौघांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने गोरेगाव आणि सांताक्रूझ येथून अटक केली. बुधवारी भल्या पहाटे दोन्ही ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी या चौघांना भेसळ करताना पकडले आणि त्यांच्याकडून सुमारे ३०० लिटर भेसळयुक्त दूध ताब्यात घेऊन ते तत्काळ नष्ट केले.

सांताक्रूझच्या जांभळीपाडा परिसरात एका घरामध्ये अमूल, महानंद, अन्नपूर्णा यांसारख्या नामांकित कंपनीच्या दुधामध्ये भेसळ केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ९चे उपनिरीक्षक विजयेंद्र आंबवडे यांना मिळाली. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत युनिट ९च्या पथकाने पहाटेच्या सुमारास या चाळीवर छापा टाकला. एक तरुण पिशव्या फोडून त्यामध्ये पाणी मिसळताना दिसून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील १८० लिटर भेसळ दूध हस्तगत करून ते तत्काळ नष्ट करण्यात आले. त्याच्याकडून भेसळ करण्यासाठी लागणारे साहित्य, अमूल ताजा, अमूल गोल्ड दुधाच्या रिकाम्या पिशव्या हस्तगत करण्यात आल्या. भेसळ करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला पुढील कारवाईसाठी वाकोला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

अशाच प्रकारची भेसळ गोरेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात दूध भेसळ करून ते परिसरामध्ये वितरित केले जात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ११ च्या पथकाला मिळाली. प्रभारी पोलिस निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने मालाड आणि गोरेगाव या दोन ठिकाणी छापे टाकले. वापरलेल्या रिकाम्या पिशव्यांमध्ये दूध भरून त्यामध्ये पाणी मिसळताना काही जण आढळले. अमूल ताजा, गोकुळ सात्विक, अमूल गोल्ड या कंपनीच्या दुधाच्या पिशव्या फोडून भेसळ करण्यात आलेले सव्वाशे लिटर दूध पोलिसांनी हस्तगत केले. या दोन्ही प्रकरणात मालाड आणि गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक भाग दूध, एक भाग पाणी
ही भेसळ करताना एक लिटरच्या पिशवीमधून जवळपास निम्मे दूध काढून त्यामध्ये ड्रम तसेच, अस्वच्छ टाक्यांमध्ये भरलेले पाणी मिसळले जात होते. याप्रकारे एक लिटर दुधातून दोन लिटर भेसळयुक्त दूध तयार केले जात होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Source link