हायलाइट्स:
- मुंबईत पावसाचं रौद्ररुप दाखवणारा VIDEO
- पाण्यासारखी वाहिली कार
- मुंबईत आताही मुसळधार पाऊस सुरू
मुंबईत बोरिवलीमध्ये कार वाहून गेल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावरून आपण मुंबईतील पावसाच्या रौद्ररुपाचा अंदाज लावू शकतो. खरंतर, मुंबईत आताही मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे हिंदमाता, सायन, किंग सर्कल, कुर्ला अशा अनेक सखल भागात रस्ते पाण्याखाली गेले आहेत. हिंदमाताला मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पालिकेचे पथक पंपांच्या माध्यमातून हे पाणी काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. कांदिवली पूर्वेकडील हनुमान नगर भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे.
जोरदार पाऊस पावसामुळे रविवारी पहाटे बोरिवलीमध्ये रस्ते पाण्याखाली गेले आहेत. याशिवाय मुंबईतील चेंबूर भागात भिंत कोसळल्याची बातमी आहे. ही भिंत पडल्यामुळे जवळपास ४-५ घरांचं नुकसान झालं असून १६ लोकांची सुटका करण्यात आली आहे.
मुंबईसह आसपासच्या शहरातही पावसाने (Mumbai Rain Update) जोरदार हजेरी लावली आहे. फोर्ट परिसर, कल्याण, भांडूप या परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. ठाणे आणि रायगडमध्येही मेघगर्जनेसह मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात ढगांनी मोठी दाटी केली आहे. मध्य मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, हवामान खात्याने रविवारीही मुंबई व आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात २५३.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 12 वर्षात तिसऱ्यांदा जुलै महिन्यात एकाच दिवसात इतका पाऊस झाला आहे. आयएमडीच्या आकडेवारीनुसार, याआधीही मुंबईत १५ जुलै २००९ रोजी २७४.१ मिमी पाऊस पडला होता तर २ जुलै २०१९ रोजी ३७६.२ मिमी पाऊस पडला. यामुळे लोकांना समुद्रापासून दूर रहाण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.