Home ताज्या बातम्या मुंबईला मिळाले एटीव्ही सुरक्षाकवच; काय आहे वैशिष्ट्य?

मुंबईला मिळाले एटीव्ही सुरक्षाकवच; काय आहे वैशिष्ट्य?

0
मुंबईला मिळाले एटीव्ही सुरक्षाकवच; काय आहे वैशिष्ट्य?

हायलाइट्स:

  • मुंबईला मिळाले एटीव्ही वाहनांचे सुरक्षाकवच
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवला हिरवा झेंडा
  • चौपाटी परिसरात घालणार गस्त

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची सुरक्षा ही नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. मुंबई पोलीस आपल्या परीनं ही जबाबदारी चोख पार पाडतात. आता त्यांच्या दिमतीला सुसज्ज व अत्याधुनिक अशी ‘एटीव्ही’ (ऑल टेरेन व्हेईकल्स) वाहने आली आहेत. ही वाहने प्रामुख्यानं चौपाटी परिसरात गस्त घालणार आहेत. (Mumbai Police gets ATV Vehicles)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वाहनांना हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते. रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने ही वाहने देण्यात आली आहेत.

वाचा: भर बाजारपेठेत घोड्याच्या टापांचा आवाज, लोक बघतच बसले

मुंबई पोलीस दलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आलेल्या या वाहनाला सर्वपृष्ठीय वाहन असे म्हटले जाते. एखादी अनुचित घटना घडल्यास तत्काळ मदतीला पोहचण्यासाठी या वाहनाचा वापर करता येतो. त्यासाठी ही वाहने मुंबई पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. हे एक सर्वसमावेशक असे वाहन आहे. ते जमीन, दलदल व वालुकामय अशा सर्व प्रकारच्या पृष्ठभागावर चालते. त्यामुळे चौपाटी परिसरात याचा वापर करता येऊ शकतो. या वाहनांची क्षमता ५७० सीसी इतकी आहे. त्यामुळे ते वेगवानही आहे. बंदोबस्तावरील चार जण या वाहनातून गस्त घालू शकतात. आणीबाणीच्या प्रसंगी वाहनातील दोरखंड, तरंगते हूक्स (Floating Hooks) अशा सुविधांचाही वापर करता येऊ शकतो.
गिरगाव चौपाटी येथे झालेल्या या सोहळ्यास पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, राज्याचे पोलीस महासंचालक संजीव पांडे, मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील तसेच रिलायन्स फाऊंडेशनच्या शिरीन कोतवाल आदी उपस्थित होते.

वाचा: भुकेलेल्या सापाने गिळली सव्वा किलोची कोंबडी

Source link