Home शहरे मुंबई मुंबईसह उपनगरांमध्ये ‘कोसळ’धार!

मुंबईसह उपनगरांमध्ये ‘कोसळ’धार!

मुंबईसह उपनगरांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. रात्रीपासून पडणाऱ्या पावसाचा जोर सकाळी वाढला आहे. गोरेगाव, मीरा रोड, लालबाग, परळ, या ठिकाणी असलेल्या सखल भागांमध्ये पाणी साठण्यास सुरूवात झाली आहे. अंधेरी, वांद्रे परिसरातही जोरदार पाऊस पडतो आहे. मुंबईतल्या अनेक ठिकाणी असलेल्या सखल भागांमध्येही पाणी साठण्यास सुरूवात झाली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरची उड्डाणंही थांबवण्यात आली आहेत. मुंबई एअरपोर्टच्या प्रवक्त्याने एएनआयला ही माहिती दिली आहे.

गेल्या आठवड्यात पावसाने मुंबईची दाणादाण उडवली होती. मध्य रेल्वे १६ तास बंद झाली होती. शनिवारीही पावसामुळे मुंबईतल्या मुलुंड स्थानकात पावसामुळे ओव्हरहेड वायरवर झाड कोसळले होते. ज्यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला होता. अद्याप तरी कोणतीही सूचना आलेली नाही. त्यामुळे मुंबईकरांची त्रेधा आठवड्याच्या पहिल्याच दिवशी उडालेली नाही. मात्र पावसाचा बेस्ट बस सेवेवर परिणाम झाला आहे. विक्रोळी ते कांजूरमार्ग दरम्यान रेल्वे रूळांवरही पाणी साठलं होतं जे आता ओसरण्यास झाली आहे.

लालबाग, परळ हिंदमाता परिसरात पाणी साठण्यास सुरूवात झाली आहे. सायनजवळच्या गांधी मार्केटमध्येही पाणी साठलं आहे. त्यामुळे बेस्ट बस सेवेची वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरही पाणी साठण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची चिन्हं आहेत.