मुंबई, दि. ११ : मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय जमिनीवरील अनधिकृत अतिक्रमणे निष्कासन मोहिम, जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागाच्या समन्वयातून सुरु केली आहे. कुर्ला तालुक्यामधील मानखुर्द येथील ११ एकर शासकीय जागा अतिक्रमणमुक्त करून मुंबई मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे सुपूर्द केल्यानंतर आता, या अतिक्रमण निष्कासन मोहीमेअंतर्गत ११ जून २०२६ रोजी, मौजे मानखुर्द, ता. कुर्ला येथील नगर भूमापन क्रमांक १/१ तसेच मंडाळे येथील ६/१ व खाडीलगत शासकीय जागेवरील व्यवसायिक वापरली जाणारी अनधिकृत २२० गोडाऊन/गाळे इ. निष्कासित करुन एकूण १४ एकर शासकीय जमीन अतिक्रमण मुक्त केली.
या मोहीमेमध्ये पोलीस उपायुक्त, परिमंडळ ६ समीर शेख यांनी सुरक्षा उपलब्ध करून दिली यामुळे निष्कासन मोहित यशस्वी पार पडली. निष्कासन मोहिम अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का) पूर्व उपनगरे, उपजिल्हाधिकारी (अति/निष्का) चेंबूर, उपविभागीय अधिकारी (पूर्व उपनगरे), बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त (एम/पूर्व), तहसिलदार कुर्ला, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर भूमापन अधिकारी, चेंबूर व इतर प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सहाय्याने करण्यात आली.
ही कारवाई शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस विभागाचे सुमारे ६०० अधिकारी व कर्मचारी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे १५० कर्मचारी, महसूल विभागाचे १०० अधिकारी व कर्मचारी, नगर भूमापन विभागाचे १० अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तसेच अतिक्रमण हटविण्यासाठी ३ पोकलेन यंत्रे व ४ जेसीबी यंत्रांचा वापर करण्यात आला. संबंधित जागा संरक्षित करुन शासनाच्या धोरणानुसार, शासकीय प्रकल्प/विभाग यांना देण्यासाठी तात्काळ कार्यवाही केली जाणार आहे.
प्रशासनाच्या समन्वयातून आणि महसूल विभागाच्या प्रभावी कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटवून ही महत्त्वाची शासकीय जमीन ताब्यात घेण्यात यश आले आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील इतर शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे हटवण्यासाठीही अशाच प्रकारची विशेष मोहीम तीव्र गतीने राबवली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
००००





















WhatsApp