Home बातम्या ऐतिहासिक मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथ महोत्सवाचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन

मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथ महोत्सवाचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन

0
मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथ महोत्सवाचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन

मुंबई, दि.२: महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाच्या  जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर तर्फे दरवर्षी ग्रंथ महोत्सव साजरा केला जातो. यंदा हा महोत्सव नॅशनल लायब्ररीच्या संयुक्त विद्यमाने दि. ४ व ५ मार्च रोजी होणार आहे. ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री  मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते होणार असून सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांची यावेळी उपस्थिती लाभणार आहे.

दि.४ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता आमदार अॅड. आशिष शेलार आणि शिक्षणाधिकारी राजू तडवी यांच्या उपस्थितीत ग्रंथ दिंडीने महोत्सवाची सुरवात होईल.

दुपारी १२ ते १.०० या वेळेत ज्येष्ठ गिर्यारोहक राजू देसाई यांचे ‘अपरिचित स्वराज्याचा इतिहास’ या विषयावर भाषण होणार आहे. दुसऱ्या सत्रात हास्य कविता आणि आरोग्य या विषयावर सुनील हिंगणे बोलणार आहेत. त्यानंतर  दुपारी ३.४५ नंतर  नव्या ग्रंथातील वाचनीय अर्पण पत्रिकांचे वाचन होणार आहे. यात अनिल हर्डिकर, नंदू परदेशी आणि चित्रा वाघ यांचा सहभाग असणार आहे.

दुसऱ्या दिवशी दि.५ मार्च रोजी पहिल्या सत्रात ‘प्रकाशन व्यवसायातील आव्हाने’ या परिसंवादात डिम्पल प्रकाशनाचे अशोक मुळे, मॅजेस्टिक पब्लिशिंगचे अशोक कोठावळे, जयहिंद प्रकाशनचे हेमंत रायकर, ज्योत्स्ना प्रकाशनाचे विकास परांजपे आणि ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांचा सहभाग असणार आहे.

वाचन संस्कृती, सामाजिक बांधिलकी या विषयावर चेतना महाविद्यालया तर्फे पथनाट्य सादर करण्यात येणार आहे.अवयव दान काळाची गरज या विषयावर पुरुषोत्तम पवार हे सादरीकरण करणार आहेत.

याशिवाय राकेश तळेगावकर यांची संकल्पना असलेले  मराठी साहित्यातील उत्तम व अभिजात पत्र साहित्यावर आधारित कार्यक्रमात श्रीनिवास नार्वेकर, अस्मिता पांडे, राजश्री पोतदार, आशुतोष घोरपडे, समीर दळवी आणि विनीत मराठे यांचा सहभाग असणार आहे.

समारोप ‘वाचनाची आनंदयात्रा’ या कार्यक्रमाने होईल. यात ज्योती कपिले, विनम्र भाबल, तसेच महिला वाहतूक पोलीस कर्मचारी मेधा तामोरे आणि सुप्रिया रणधीर हे आपले मनोगत व्यक्त करतील. या महोत्सवात ग्रंथ प्रदर्शन व विक्री यांचे स्टॉल असणार आहेत. दोन्ही दिवसांचे कार्यक्रम ग्रंथप्रेमी आणि वाचक प्रेमींसाठी विनामूल्य असणार आहेत.दोन दिवस सुरू असणाऱ्या या ग्रंथ महोत्सवात वाचन प्रेमी, ग्रंथ प्रेमी आणि सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मुंबई उपनगरचे मुलुंड येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी  संजय बनसोड यांनी केले आहे.

०००

संध्या गरवारे/वि.सं.अ./