Home ताज्या बातम्या मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर ते धामणदेवीच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरु होणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर ते धामणदेवीच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरु होणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

0
मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर ते धामणदेवीच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरु होणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

मुंबई, दि. ९ – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला आता अधिक गती मिळणार असून या महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील इंदापूर ते धामणदेवी या सुमारे ६.५ कि.मी. च्या रखडलेले चौपदरीकरणाचे काम आता लवकरच सुरु होणार आहे. सुमारे २ वर्षे रखडलेले हे काम सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी अवघ्या १५ दिवसांत मार्गी लावल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ च्या इंदापूर ते धामणदेवीच्या चौपदरीकरणाच्या मार्गाची जमिन ही वनजमीन असल्यामुळे वनविभागाची परवानगी आवश्यक होती, त्यामुळे हे काम गेले दोन वर्षांपासून रखडले होते. या चौपदरीकरणाचे काम करण्यासाठी वनविभागाकडे वनजमीन मंजुरीचा प्रस्ताव स्टेज १च्या परवानगीसाठी प्रलंबित होता.  परंतु त्या प्रस्तावानुसार स्टेज १ साठी मुख्य मान्यता वनविभाग नागपूर यांनी २२ एप्रिल २०२१ रोजी दिली होती. तथापि सदर परवानगी देताना वनखात्यामार्फत रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी (Avenue Plantation) रक्क्म रु  १५.९१ कोटी भरण्याची अट वनविभाग नागपूरकडून घालण्यात  आली होती. परंतु सदर रकमेची तरतूद ही या प्रकल्प निधीमध्ये नसल्यामुळे सदर रक्कम वनविभागाकडे जमा करण्यासाठी काही अडचणी येत होत्या. गेल्या १५ दिवसांपूर्वी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या निर्दशनास हे प्रकरण आले असता त्यांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिका-यांची या संदर्भात बैठक घेतली. या बैठकीतच मंत्री चव्हाण यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्रालय यांच्याशी चर्चा करून झाडे लावण्यासाठीचे आवश्यक १५.९१ कोटी रुपये लवकर भरण्याची  परिवहन मंत्रालयाकडे केली. त्यानुसार केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्रालय यांच्याकडून आवश्यक १५.९१ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.

केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्रालयाकडून आवश्यक आर्थिक मंजुरी मिळाल्यानंतर मुंबई-गोवा या महामार्गावरील या प्रलंबित राहिलेल्या टप्प्याच्या कामासाठी लवकर परवानगी देण्याची विनंती आता वन विभागाकडे करण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांच्या दृष्टीने हे काम लवकर पूर्ण होणे अपेक्षित आहे. जेणेकरुन नागरिकांना त्यांच्या प्रवासामध्ये दिलासा मिळू शकेल अशी अपेक्षा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.

त्यानुसार वनविभागानेही सकारात्मक पावले उचलचून या जागेसाठी तत्वत: मंजुरी दिली आहे. तसेच या चौपदीकरणासाठी  प्रत्यक्ष काम करण्याची परवानगी अंतिम टप्प्यात आहे, ही परवानगी काही दिवसांत मिळाल्यानंतर तातडीने इंदापूर ते धामणदेवी या सुमारे ६.५ किमी च्या चौपदीकरणाचे काम सुरु होणार असून मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला अधिक गती मिळेल व काम लवकर पूर्ण करणे शक्य होईल असेही मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.