Home ताज्या बातम्या मुंबई : डॉक्टरने सिम कार्ड ब्लॉक होऊ नये म्हणून त्या लिंकवर क्लिक केले अन्….

मुंबई : डॉक्टरने सिम कार्ड ब्लॉक होऊ नये म्हणून त्या लिंकवर क्लिक केले अन्….

0
मुंबई : डॉक्टरने सिम कार्ड ब्लॉक होऊ नये म्हणून त्या लिंकवर क्लिक केले अन्….

म. टा. खास प्रतिनिधी,
सिम कार्ड ब्लॉक होऊ नये यासाठी कागदपत्रे अपलोड करण्याकरिता आलेल्या लिंकवर क्लिक करणे दादरमधील एका डॉक्टरला चांगलेच महागात पडले आहे. या लिंकवर स्वतःची माहिती आणि बँकेचा तपशील भरताच या डॉक्टरच्या बँक खात्यामधून १० लाख रुपये चोराच्या खात्यात वळते झाले. फसवणूक झाल्याचे कळताच या डॉक्टरने शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार केली.

दादर परिसरात राहणाऱ्या आणि याच ठिकाणी क्लिनिक चालविणाऱ्या एका ६५ वर्षीय डॉक्टरच्या मोबाइलवर एक संदेश आला. ‘आपले सीम कार्ड सर्व कागदपत्रे जमा न केल्यामुळे बंद करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी कस्टमर केअरशी संपर्क साधावा,’ असे नमूद करून या संदेशामध्ये एक मोबाइल क्रमांक देण्यात आला होता. डॉक्टरने या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता, कस्टमर केअरमधील प्रतिनिधीने कागदपत्रे अपूर्ण असल्याचे सांगितले. त्याने डॉक्टरच्या मोबाइलवर दोन वेगवेगळ्या लिंक पाठवल्या. एका लिंकवर स्वतःची माहिती आणि दुसऱ्या लिंकवर बँक खात्याचा तपशील भरला. काही वेळातच डॉक्टरच्या मोबाइल एका पाठोपाठ एक संदेश आले. टप्प्याटप्प्याने डॉक्टरच्या बँक खात्यामधून १० लाख २२ हजार रुपये परस्पर वळविण्यात आले. रक्कम मोठी असल्याने डॉक्टरांना बँकेतूनही याबाबत फोन आला. मात्र, तोपर्यंत रक्कम वळती झाली होती.

पैसे गेल्याचे कळताच डॉक्टरने कस्टमर केअरच्या प्रतिनिधीशी पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्यासोबत काहीच संपर्क होत नसल्याने त्यांनी बँकेत आणि शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून शिवाजीपार्क पोलिसांनी गुन्हा दाखल करून बँक तपशील, तसेच इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे डॉक्टरची फसवणूक करणाऱ्याचा शोध सुरू केला आहे.

Source link