Home शहरे मुंबई मुंबई डोंगरी इमारत कोसळली: 2 मृत्युमुखी, ढिगाऱ्याखाली 50 जण अडकल्याची भीती

मुंबई डोंगरी इमारत कोसळली: 2 मृत्युमुखी, ढिगाऱ्याखाली 50 जण अडकल्याची भीती

मुंबईच्या डोंगरी भागात मंगळवारी केसरबाई नावाच्या इमारतीचा एक मोठा भाग कोसळला. यात दोन जणांचा मृत्यू झाल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सागितलं.तर 40-50 जण या चार मजली इमारतीखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून ढिगाऱ्याखाली अडकलेले लोक बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत”प्राथमिक माहितीनुसार सुमारे 15 कुटुंबीय डोंगरी येथील इमारत दुर्घटनेत दबले असण्याची शक्यता आहे. आम्ही संपूर्ण लक्ष आधी मदतकार्याकडे केंद्रित केले आहे,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.आतापर्यंत काही जखमींना बाहेर काढण्यात यश आलं असून, यात एका चिमुकल्याचाही समावेश आहे. जखमींना जेजे हॉस्पिटलमध्ये नेलं जात आहे.

नेमकं काय घडलं?

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, “मी दर्ग्यात होतो मागे तेवढ्यात एक माणूस धावत आला की बिल्डिंग कोसळली. ही कमीत कमी 80 वर्ष जुनी बिल्डिंग असेल. या भागातल्या सगळ्या बिल्डिंग या जुन्या आहे. अजूनही 30-40 लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता आहे.”

“ही साधारण 100 वर्ष जुनी इमारत होती. म्हाडाच्या अतिशय धोकादायक इमारतींमध्ये या इमारतीचा समावेश नव्हता. म्हणजे म्हाडाने कारवाई करून रिकाम्या कराव्या लागणाऱ्या इमारतींमध्ये या इमारतीचा समावेश नव्हता. पण विकासकाने वेळेत काम केलं की नाही याची चौकशी करावी लागेल. ती आम्ही करूच,” मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.हा परिसर दाटीवाटीचा, अरुंद गल्ल्यांचा आणि गर्दीचा असल्याने इथे मदतकार्यात अडचणी येत आहेत. गृहनिर्माण मंत्री तिथे गेलेत. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना आवश्यक मदतीच आदेश देण्यात आले आहेत. संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात येतील, असंही ते पुढे म्हणाले.

मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगडाले यांनी या घटनेविषयी बोलताना सांगितलं की, “आजूबाजूच्या इमारतींना धोका असून त्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेचे कर्मचारी आणि जेसीबीच्या सहाय्याने मदतकार्य सुरू आहे. NDRF ला पाचारण करण्यात आलं आहे.”

भायखळ्याचे आमदार वारिस पठाण यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, “आम्ही सरकारकडे गेल्या चार वर्षांपासून धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करतो आहोत, पण सरकारने त्याकडे लक्ष दिलेलं नाही.”

प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे अशा घटना घडतात असा आरोपही त्यांनी केला