मुंबई पोलिसांची कारवाई; १९ महिन्यात अकराशे कोटींचे अमली पदार्थ जप्त

- Advertisement -

मुंबई: महानगरात अमली पदार्थाची तस्करीचे प्रमाण वाढत चालले असल्याचे मुंबई पोलिसांनी त्याबाबत केलेल्या कारवाईवरुन स्पष्ट होत आहे. गेल्या १९ महिन्यात तब्बल १०८१ कोटींचे अमली व उत्तेजक पदार्थ जप्त केले असून याप्रकरणी १०७३ जणांना अटक केली. माहिती अधिकार कायद्यान्वये मिळालेल्या माहितीतून ही आकडेवारी पुढे आली आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत हेरॉईन, चरस, कोकेन, गांजा, एमडी, एलसीडी या अमली आणि उत्तेजक पदार्थांचा समावेश आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलिसांकडे याबाबत विचारणा केली होती.

त्याबाबत जानेवारी २०१८ ते ३१सप्टेंबर २०१९ या कालावधीत अमली पदार्थसंबंधी केलेल्या कारवाईची माहिती दिली आहे. त्यानुसार १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत हेरॉईन, चरस, कोकेन, गांजा, एमडी, एलसीडी हा १३६३ किलो ३२४१ ग्रॅम १३६४ मिली ग्रॅम हस्तगत केला. त्यांची किंमत १०१६ कोटी ३२ लाख ५६ हजार ४५ हजार इतकी आहे. त्या प्रकरणी ३९५ जणांना अटक केली आहे. सर्वाधिक १९४ आरोपी हे गांजा विक्री प्रकरणातील आहेत. १ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत ६४ कोटी ६४ लाख ६२ हजार ३५२ रुपये किंमतीचा १६९ किलो ४१५० ग्रॅम १२६२ मिली ग्रॅम इतका माल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी गेल्यावर्षीच्या दुप्पट म्हणजे एकूण ६७८ जणांना अटक करण्यात आली आहे.

अनिल गलगली यांच्या मते मुंबईत बाहेरील राज्यांतून अमली आणि उत्तेजक पदाथार्चा पुरवठा होत असून कार्यवाहीची व्याप्ती वाढवणे गरजेचे आहे . त्यामध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्याची आवश्यकता आहे.

- Advertisement -