मुंबई:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या देशव्यापी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही निर्बंध शिथिल करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार राज्य सरकारने काही निर्बंध शिथिल केले होते. त्यानुसार राज्यात आणि राज्याबाहेर प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतु, त्यासाठी ई-पास असणे बंधनकारक करण्यात आले. पण हे ई-पास आपत्कालीन परिस्थितीतच देण्यात येत होते. तसेच अधिकृत संकेतस्थळ त्यासाठी सुरु करण्यात आले आहे.
दरम्यान काही प्रवासी अपुऱ्या माहिती अभावी बनावट ई-पासला बळी पडत असल्यामुळेच बनावट ई-पास रॅकेटला आळा घालण्यासाठी मुंबईच्या डोंगरी परिसरातील झोन-1 चे डिसीपी संग्रामसिंह निशाणदार यांनी मुंबईकरांना विशेष आवाहन केले आहे. ई-पास कोणत्याही अनधिकृत व्यक्ती किंवा संस्थेकडून बनवून घेऊ नका. तुम्हाला ई-पास जवळील स्थानिक पोलिस स्टेशन किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळतील, असे त्यांनी सांगितले आहे.
ट्विटरच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी जनतेला सतर्क केले आहे. यात त्यांनी बनावट ई-पास रॅकेटला बळी पडू नका, असे आवाहन मुंबईकरांना केले आहे. ई-पास मिळवण्यासाठी Covid19.mhpolice.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. तुमची सर्व माहिती तेथे भरुन आवश्यक ती कागदपत्रे जोडून समाविष्ट करा. त्यानंतर तुमच्या माहितीची पडताळणी करुन तुम्हाला ई-पास देण्यात येईल.
राज्याच्या विविध ठिकाणी लॉकडाऊनमुळे अडलेले नागरिक मूळ ठिकाणी परतण्यासाठी धडपडत आहेत. अशा परिस्थिती ई-पास मिळवण्यासाठी पुरेशी माहिती उपलब्ध नसल्यास चुकीच्या किंवा अनधिकृत व्यक्ती किंवा संस्थेकडून ई-पास मिळवला जातो. परंतु, नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी हे सतर्कतेचे आवाहन केले आहे.