मुंबई, दि. 27 : जागतिक पर्यटन दिनानिमित्त जिल्हाधिकारी मुंबई शहर यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या मोबाईल ॲपच्या प्रसिद्धीची सुरुवात मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आज मंत्रालयासमोरील नवीन प्रशासन भवन येथे करण्यात आली.
मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या या ॲपबाबत पालकमंत्री यांनी समाधान व्यक्त केले. या पर्यटनविषयक मोबाईल ॲपचा लाभ, पर्यटक, विद्यार्थी व अभ्यासक यांना निश्चित होईल आणि मुंबई शहर जिल्हा पर्यटन विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.
तद्नंतर पालकमंत्री श्री.केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा संबंधित यंत्रणा प्रमुखांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यात प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, कौशल्य विकास कार्यक्रम, पायाभूत सुविधा तसेच पर्यटन व मत्स्य विकास या योजनांचा आढावा घेण्यात आला. या सर्व योजनांचे सविस्तर सादरीकरण जिल्हाधिकारी मुंबई शहर यांनी केले. जिल्हा नियोजन मंडळाच्या कार्यकारी समितीची बैठक नूतन समिती गठित करून घेण्यात यावी, असे श्री.केसरकर यांनी निर्देशित केले.
यावेळी हाजी अली विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यानुसार हाजी अली विकास आराखडा आणि महालक्ष्मी मंदिर परिसरात आवश्यक विविध सुधारणांबाबत प्राथम्याने कार्यवाही करण्याबाबत पालकमंत्री श्री.केसरकर यांनी सूचना केल्या.