अमर्त्या राव () या रेल्वे स्टेशनवर स्टॉल असलेल्या युवकाची गोष्ट चित्रपट सांगतो. ‘हप्ता देणार नाही,’ असं ठणकावून सांगणारा अमर्त्या (नेहमीप्रमाणे) परिस्थितीमुळे ‘डॉन’ बनतो. बॉम्बे नाही, मुंबईच असं ठासून सांगणारे भाऊ () शहराचे कर्ते-करविते आहेत. त्यांच्या इशाऱ्यावर शहर चालतंय. अमर्त्याचा माज सहन न झालेला आणि एक विशिष्ट ‘इलाका’ स्वत:चा असलेला गायतोंडे () अमर्त्याच्या विरोधात आहे. दुसरीकडे अमर्त्यलाही भाऊ आणि आणखी एक डॉन नारी खानचा (गुलशन ग्रोव्हर) पाठिंबा आहे. अमर्त्याचं अचानक मोठं होणं त्याच्या आपल्या म्हणवणाऱ्यांच्या डोळ्यात खुपत आहे. ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ अशी ओळख असलेला विजय सावरकर (इम्रान हाश्मी) या कथेत येतो आणि मग सुरू होतो टिपिकल चोर-पोलिसाचा खेळ. मग पुढे काय होतं, हे वेगळं सांगायची गरज नाही.
‘शूट आउट अॅट लोखंडवाला’, ‘शूट आउट अॅट वडाळा’ यांसारख्या संजय गुप्ताच्या सिनेमात जे आपण पाहिलं, त्याच ‘पॅटर्न’ची मांडणी इथेही केली जाते. अॅक्शन फिल्मवर विशेष प्रेम असलेल्या आणि अंडरवर्ल्डमधील टोळीयुद्धांचा विशेष ‘अभ्यास’ असलेल्या संजय गुप्ताकडून एका टिपिकल बॉलिवूड मसालापटाची असलेली अपेक्षा पूर्ण होते. ढीगभर व्यक्तिरेखा, त्यांचे परस्परसंबंध, ऐंशी-नव्वदच्या दशकातलं मुंबईतील कापड गिरण्या आणि त्या अनुषंगानं होणाऱ्या राजकारणाचं प्रस्थ हे सारं इथे मांडण्यात किंबहुना त्यांची फक्त तोंडओळख करून देण्यात इथे बराच वेळ निघून जातो. एकात एक गुंतलेल्या गोष्टी, राजकीय व्यक्तींचा या सर्वावर असलेला वरदहस्त हे लेखक-दिग्दर्शक मांडतो. त्यातील अनेक व्यक्तिरेखा याच दशकांमध्ये प्रत्यक्षातही असल्याचे संदर्भ अगदी कोणालाही सहज कळतील असे आहेत.
मुंबईच्या एकूणच समाजकारणावर आणि राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्यांचे संदर्भ अगदी ठळकपणे येतात. या दोन दशकांमध्ये मुंबईत माफियांचं फोफावलेलं साम्राज्य यापूर्वी काही सिनेमांत आपण प्रभावीपणे अनुभवलंय. त्या तुलनेत इथली मांडणी खूपच वरवरची आणि ‘अॅक्शन सीन’पुरती मर्यादित राहते. अगदी ‘काँटे’पासून संजय गुप्ताच्या आवडत्या ‘सेपिया टोन’मध्येच सिनेमा मांडला जातो आणि तत्कालीन काळाचा आभास निर्माण केला जातो. जॉन अब्राहमसह सर्वच कलाकारांची फौज आपापल्या भूमिका उत्तम करते. अमोल गुप्तेचा गायतोंडे लक्षात राहणारा. बाकी , आकाश खुराना, रोहित रॉय, काजल अग्रवाल यांसारख्या अनेक कलाकारांना फारसा स्कोप नाही. सुनील शेट्टी पाहुणा कलाकार म्हणून दिसतो. या व्यक्तिरेखा फक्त ‘ओळख परेड’सारख्या येऊन जातात. यो यो हनी सिंगचं एक सुमार गाणं ‘आयटम साँग’च्या रूपात येतं. अमर मोहिले यांचे संगीत वेगवान आहे. थोडक्यात काय तर ‘मुंबई सागा’ एक टिपिकल मसाला फिल्म आहे. जाता जाता ती सहज (अगदी फॉरवर्ड करत) पाहण्यासारखी आहे. समजा चुकूनच ‘मिस’ झाली, तर काही फार मोठा फरक पडणार नाही.
निर्माता : भूषण कुमार, कृष्ण कुमार, अनुराधा गुप्ता
दिग्दर्शक : संजय गुप्ता
कथा-पटकथा : संजय गुप्ता, वैभव विशाल, रॉबिन भट
संगीत : अमर मोहिले, यो यो हनी सिंग
कलाकार : जॉन अब्राहम, महेश मांजरेकर,इम्रान हाश्मी, अमोल गुप्ते, प्रतीक बब्बर, आकाश खुराना, काजल अग्रवाल, सुनील शेट्टी, गुलशन ग्रोव्हर
ओटीटी : अॅमेझॉन प्राइम
दर्जा : दोन स्टार