Home ताज्या बातम्या मुक्या प्राण्यांच्या मदतीसाठी सरसावले प्राणीमित्र व्यक्ती अन् सामाजिक संस्था

मुक्या प्राण्यांच्या मदतीसाठी सरसावले प्राणीमित्र व्यक्ती अन् सामाजिक संस्था

0

जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि पशूसंवर्धन विभागाच्या आवाहनाला

मिळतोय भरघोस प्रतिसाद

अलिबाग,जि.रायगड: जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक बाबीखाली दूध, मटन,अंडी,जनावरांचे खाद्य, वैरण आणि पशुवैद्यकीय दवाखाने, पेटशॉप या बाबींचाही समावेश आहे.  पशूपालकांचा व्यवसाय पूर्ववत राहावा, त्यांच्याकडील उत्पादित केलेले दूध, मटन,अंडी इत्यादींना मागणी असल्याने बाजारपेठेपर्यंत वाहतूक करण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी लॉकडाऊनच्या काळात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, रायगड डॉ.सुभाष म्हस्के यांना प्राधिकृत केले आहे.

श्रीमती सीमा शांतीलाल पुनमिया यांनी पंख फाऊंडेशनच्यावतीने मुक्या प्राण्यांची भूक शमवण्यासाठी फूड बँकची स्थापना केली आहे.  या पंख फाउंडेशनच्या ॲनिमल फूड बँकच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद  देत श्री.अमित जैन यांनी 51 चपाती, विजय शाह यांनी 500 रुपये दिले  तर अमित पेरवी यांनी श्वानांसाठी तीन दिवस पुरतील इतके बिस्किटस् चे दोन मोठे पॅकेट दिले.

जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, जिल्हास्तरीय प्राणी क्लेश समिती सदस्य व प्राणी मित्र तसेच प्राणी कल्याणाकरिता सतत झटणाऱ्या  व्यक्ती यांचीही मदत घेण्यात येत आहे.  पेण मधील  प्राणीमित्रांनीही ॲनिमल फूड बँकला उत्तम प्रतिसाद दिला आहे.  महाड येथील लघु पशू सर्वचिकित्सालय पशू व श्वानांसाठी प्राणीप्रेमींकडून खाद्य व चारा स्वयंस्फूर्तीने  उपलब्ध होत आहे.

तसेच  अलिबाग तालुक्यातील मापगाव येथील कूकूच..कू पोल्ट्री यांनी अलिबाग येथील घोड्यांची उपासमार होवू नये म्हणून 150 किलो मका भरडा वाटप केले.  रेवदंडा येथून जैन समाजाकडून. घोड्यांसाठी एकूण 1 हजार किलो  खाद्य तसेच अलिबाग जैन समाज यांच्याकडून एकूण 9 हजार  किलो खाद्य मिळाले आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. सुभाष म्हस्के यांनी कळविले आहे.

राष्ट्रीय आपत्तीच्या या काळात सर्व दानशूर प्राणीमित्र व्यक्तींचे, संस्थांचे  त्यांनी केलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल जिल्हाधिकारी  श्रीमती निधी चौधरी यांनी आभार मानले असून जिल्ह्यातील इतर सामाजिक संस्थांनी, कंपन्यांनी, व्यक्तींनीही मदतीसाठी असेच पुढे यावे, असे आवाहन केले आहे.