स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी, नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर यांनी मंगळवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. केंद्र सरकारने संमत केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात महाविकास आघाडी सरकारने ठाम भूमिका मांडण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्हाला वेळ देत नाहीत, अशी खंतही शेट्टी यांनी पवार यांच्याकडे व्यक्त केली.
‘केंद्राच्या नवीन कृषी कायद्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली होती. परंतु, मुख्यमंत्री कार्यालयाकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही,’ अशी तक्रार शेट्टी यांनी पवार यांच्याकडे केली. ‘याविषयी मी जातीने लक्ष घालीन व मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेऊन तुमच्या मागण्यांवर चर्चा घडवून आणेन,’ असे आश्वासन पवार यांनी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींना दिले आहे.
वाचा:पवार-ठाकरे भेटीत ठरली केंद्र सरकारविरोधी संघर्षाची रणनीती
राजू शेट्टी, मेधा पाटकर आणि अन्य समविचारी संस्था संघटनांच्या प्रतिनिधी मंडळाने मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली. मागण्यांचे निवेदन त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिले. केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या भावना राज्य सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी ही भेट असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. या कायद्यांवर महाविकास आघाडी सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शेट्टी यांनी अजित पवार यांच्याकडे केली.
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी
‘राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करते आणि हे सरकार कायम शेतकऱ्यांच्या बाजूनेच उभे राहील. शेतकरी हिताचे पाऊल उचलण्यात सरकार मागे हटणार नाही,’ असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाच्या नेत्यांना दिले. या वेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या शिष्टमंडळात शेट्टी, पाटकर यांच्याशिवाय प्रतिभा शिंदे, एस. व्ही. जाधव, कॉ. अशोक ढवळे, नामदेव गावडे, सुभाष लोमटे, किशोर ढमाले, सीमा कुलकर्णी, सुभाष काकस्ते, उमेश देशमुख, शकील अस्मेद आदी उपस्थित होते.
वाचा: ‘त्या’ ७२७ पोलीस अधिकाऱ्यांची मुंबईबाहेर बदली होणार