
मुंबई, दि. २० : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया येथे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पारंपरिक पद्धतीने शाल पांघरून रुबियो यांचा सन्मान केला. तसेच, मुंबईच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचे प्रतीक असलेल्या गेटवे ऑफ इंडिया आणि परिसराची माहिती त्यांना दिली.
या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यात संवाद झाला. त्यानंतर दोघांनी गेटवे ऑफ इंडिया परिसराची पाहणी केली. या भेटीच्या माध्यमातून मुंबईच्या ऐतिहासिक वारशाची आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांची ओळख अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांना करून देण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेशचंद्र, राजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉ. राजेश गवांदे, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कौस्तुभ धवसे तसेच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यासमवेत आलेले शिष्टमंडळ उपस्थित होते.
०००

WhatsApp