मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या हरित अर्थव्यवस्थेला चालना  

- Advertisement -


मुंबई, दि. १७ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याच्या दिशेने हरित आणि शाश्वत विकासाला मोठी गती मिळत आहे.या वर्षाच्या सुरुवातीला पार पडलेल्या इंडिया स्टेट क्लायमेट इन्व्हेस्टमेंट फोरम (आयएससीआयएफ) २०२६ मध्ये राज्यातील स्वच्छ ऊर्जा, हरित उद्योग, कार्बन रिमूव्हल, स्वच्छ इंधन आणि कृषी क्षेत्राशी संबंधित प्रकल्पांसाठी अब्जावधी रुपयांच्या गुंतवणूक घोषणा करण्यात आल्या. या गुंतवणुकीमुळे राज्यातील हरित पायाभूत सुविधा, स्वच्छ ऊर्जा उत्पादन, शाश्वत शेती आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.

महाप्रीत आणि सुगम-सीएसएस यांच्या भागीदारीतून, महाराष्ट्रातील फळे आणि भाजीपाल्याच्या प्रमुख उत्पादन क्षेत्रांमध्ये (क्लस्टर्समध्ये) १०० सौरऊर्जेवर चालणारी सूक्ष्म शीतगृहे उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, ‘आयकार्ट’ आणि ‘आयकार्ट राईज फाउंडेशन’ यांच्या माध्यमातून, राज्यातील १० हून अधिक क्षेत्रांमध्ये शेतकरी उत्पादक संस्था आणि शेतकरी गटांसाठी आधीच उभारण्यात आलेल्या ५० सूक्ष्म शीतगृहांना बाजारपेठेशी जोडण्यासाठी सहाय्य दिले जात आहे. यामुळे फळे आणि भाजीपाल्याचे काढणीनंतर होणारे नुकसान कमी होण्यास आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात, या शिखर परिषदेच्या माध्यमातून कृषी सौर ऊर्जा आणि वितरित सौर प्रकल्पांमध्ये सुमारे ५० दशलक्ष अमेरिकी डॉलरपर्यंतच्या गुंतवणुकीबाबत स्वारस्य निर्माण झाले आहे. महावितरणच्या फीडर सोलरायझेशन कार्यक्रमांतर्गत तसेच इतर तत्सम प्रकल्पांसाठी महाराष्ट्रातील विकासकांसोबत पुढील कार्यवाही आधीच सुरू करण्यात आली आहे. राज्यातील शहरांमधील मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीच्या विद्युतीकरणासाठी, विशेष हरित वित्तपुरवठा संस्था सीकेर्स फायनान्सने एक अब्ज रुपयांपर्यंत वित्तपुरवठा करण्यास स्वारस्य दर्शविले आहे. हा वित्तपुरवठा व्यावसायिक इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर्स आणि फोर-व्हीलर्ससाठी उपलब्ध होणार असून, राज्यातील स्वच्छ वाहतूक व्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होईल.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी छतावरील सौर ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमतेच्या प्रकल्पांसाठी १०० कोटी रुपयांच्या प्रारंभिक वित्तपुरवठ्याची घोषणा करण्यात आली. यासाठी महाप्रीतसोबत भागीदारीही जाहीर करण्यात आली. कार्बन रिमूव्हल क्षेत्रात वराह या कंपनीने १०० कोटी रुपयांच्या प्रारंभिक गुंतवणुकीची, तसेच पुढील तीन वर्षांत ती एक हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याची घोषणा केली. विदर्भात १८ बायोमास गॅसिफिकेशन प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यातून १५ वर्षांच्या कालावधीत २० लाख टनांहून अधिक कार्बन डायऑक्साइड शोषणाची क्षमता निर्माण होणार आहे. या प्रकल्पातून उत्पादित बायोचार कार्बन क्रेडिटपैकी एक लाख टनांहून अधिक कार्बन रिमूव्हल क्रेडिट खरेदीसाठी मायक्रोसॉफ्ट सोबत करार करण्यात आला

महाराष्ट्रातील बायोचार, कृषिवनीकरण आणि मृदा कार्बन वाढविणे यांसारख्या निसर्गाधारित उपाययोजनांशी संबंधित संभाव्य प्रकल्पांवरील श्वेतपत्रिका मे २०२६ मध्ये युनायटेड किंग्डम येथे आयोजित कार्बन रिमूव्हल्स इन्व्हेस्टर कॉन्क्लेव्हमध्ये सादर करण्यात आली. यानंतर न्यूयॉर्क क्लायमेट वीक २०२६ च्या पार्श्वभूमीवर २२ सप्टेंबर रोजी संभाव्य गुंतवणूकदारांच्या समूहासोबत चर्चा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्राला शाश्वत विमान इंधन (एसएएफ) उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. या अनुषंगाने सीकिनेटिक्स आणि स्मार्ट फ्रेट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने एक श्वेतपत्रिका तयार करण्यात आली असून, महाराष्ट्र एसएएफ आघाडी स्थापन करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत या आघाडीला मूर्त स्वरूप मिळण्याची अपेक्षा आहे.

या परिषदेत जाहीर झालेल्या गुंतवणूक उपक्रमांमुळे महाराष्ट्रातील स्वच्छ ऊर्जा, हरित उद्योग, कार्बन व्यवस्थापन, कृषी मूल्यसाखळी आणि शाश्वत वाहतूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक आकर्षित होण्याबरोबरच राज्याच्या हरित अर्थव्यवस्थेला नवी गती मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

0000

अश्विनी पुजारी/विसंअ

 

 

 



Source link

- Advertisement -