Home ताज्या बातम्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाने २ कोटी महिलांच्या आयुष्यात बदल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाने २ कोटी महिलांच्या आयुष्यात बदल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाने २ कोटी महिलांच्या आयुष्यात बदल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात माविम अंतर्गत १० हजार ५०० गावात लाख ६५ हजार बचत गटांमार्फत २० लाख महिला जोडल्या

कोल्हापूर जिल्ह्यासाठी हजार ५० कोटी रूपयांच्या विविध विकास कामांची घोषणा

कोल्हापूर, दि. ८ : राज्यात माविम अंतर्गत १० हजार ५०० गावात, २९५ शहरात एकूण १ लाख ६५ हजार बचत गटांमार्फत २० लाख महिला जोडल्या असून राज्य शासनाने सुरू केलेले मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान २ कोटी महिलांच्या आयुष्यात क्रांतीकारी बदल घडवणारे अभियान ठरले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

कोरोची (ता. हातकणंगले) येथील महिला मेळाव्यात ते बोलत होते.  सुमारे ३५ हजारांहून अधिक महिला या मेळाव्यास उपस्थित होत्या. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री उदय सामंत, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार सर्वश्री धनंजय महाडिक, संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार सर्वश्री प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील (यड्रावकर),  माजी आमदार सुरेश हाळवणकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे,  कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह ६०० महिला सरपंच व अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराणी छत्रपती ताराबाई यांनी आपल्या अतुलनीय शौर्यातून माताभगिनींचे रक्षण केले. जनसेवेत आदर्श निर्माण करून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आपला ठसा उमटवला तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. आपण त्यांचेच वारसदार आहोत याचा सार्थ अभिमान आहे. आता सर्वच क्षेत्रात महिला भक्कमपणे उभ्या आहेत. आता शासनाने महिला धोरणही जाहीर केले आहे. राज्यातील महिला अधिक सक्षम होत असून महिला बचतगट १०० टक्के कर्जांची परतफेड करणाऱ्या महिलांचा गट आहे. म्हणूनच महिला बचत गटांचे खेळते भांडवल दुप्पट केले. सीआरपींचे मानधनही दुप्प्पट केले. अंगणवाडी व मदतनीसांची रिक्त पदे भरली जात आहेत. त्यांच्या मानधन वाढीसह अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिला जात आहे. आशा सेविकांना शासन निराश करणार नसून त्यांना लवकरच न्याय मिळेल. महिला व बालविकास विभागाला ३ हजार कोटी रूपयांची तरतूद केल्याचे सांगून महिलांसाठी एसटी प्रवासासाठी ५० टक्के सूट देणारे आपले पहिले राज्य असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला धोरणातून महिलांना प्रशासकीय व अर्थिक पाठबळ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महिला शेतकरी, शेतमजूर, उत्पादक संस्थांची स्थापना करून उत्पादक ते ग्राहक अशी एक मूल्य साखळी निर्माण करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा प्रशासनाला महिलांनी तयार केलेल्या वस्तूंसाठी उत्पादन, ब्रँडींग, विक्रीसाठी मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी देऊन महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी व पीडीतांसाठी समुपदेशन करण्याबाबत निर्णय घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत 4 कोटी महिलांच्या सर्व आरोग्य तपासण्या केल्या. महिलांना समानतेच्या वाटेवर आणण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनातून महिलांना सक्षम केले जात आहे. तसेच मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेतून 35 टक्के अनुदानाच्या योजनेतून जास्तीत महिलांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांना 50 टक्के बसमधे सवलत, आनंदाचा शिधा, लेक लाडकी योजना, येत असलेली मोफत शिक्षणाची योजना यातून शासन महिलांसाठी चांगले कार्य करीत असल्याचे सांगितले. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात महिलांमधे संघर्षाचे संस्कार केले. त्यातूनच अन्यायाविरूद्ध एक वचक निर्माण झाली. आता महाराष्ट्रात महिला सुरक्षित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की,  मागील काही वर्षांपासून महिलांच्या राहणीमानात बदल झाला असून आता त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करीत आहेत. पाश्चिमात्य देशाप्रमाणे भारतीय महिलाही कुठे कमी नाहीत. भारताला महासत्ता बनविण्यासाठी महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे. प्रधानमंत्री तसेच राज्यात मुख्यमंत्री यांनी महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक योजना हाती घेतल्या असल्याचे सांगितले.

खासदार धैर्यशील माने यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. तर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रास्ताविकात कोल्हापूर जिल्हयातील महिलांसाठी राबविलेल्या योजनांची माहिती दिली.

कोल्हापूर जिल्ह्यासाठी हजार ५० कोटी रूपयांच्या विविध विकास कामांची घोषणा

जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने पंचगंगा पूर नियंत्रणासाठी 3200 कोटींचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. यातील निधीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी 750 कोटी रूपयांचा प्रकल्प आराखडा सादर झाल्याचे त्यांनी सांगितले. नगरोत्थानमधून इचलकरंजी शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटी रूपये देण्याची घोषणा त्यांनी केली. इचलकरंजी मधील साध्या यंत्रमागांसाठी 1 रूपया व ऑटोलूमसाठी 75 पैसे वीजबिलात सूट देण्याचा निर्णयही त्यांनी यावेळी घोषित केला. तर कोल्हापूरमधील शेतकऱ्यांसाठी केलेल्या 200 पट पाणीपट्टीच्या वाढीला त्यांनी स्थगिती दिली. कोल्हापूर खंडपीठही लवकरच सुरू करणार असून त्यासाठी उच्चस्तरावर बोलणी सुरू असल्याचे सांगितले. मागणी केल्यानुसार कोल्हापूरमधील उर्वरीत एसटी वाहतूकीतही महिलांसाठी 50 टक्के सवलतीची घोषणा त्यांनी केली. कार्यक्रमात हातकणंगले येथे जाहिर झालेल्या एमआयडीसीचा परवाना मुख्यमंत्री श्री. शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंज यांनी खासदार धैर्यशील माने यांचेकडे सुपूर्द केला. अशा प्रकारे कोल्हापूर मधील 4050 कोटी रूपयांच्या विकास कामांची घोषणा त्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत जिल्हास्तरीय महिला मेळाव्याचे आयोजन जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे हस्ते विविध महिला लाभार्थींना साहित्याचे व अनुदानाचे वाटप करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण पार पडले.

राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात झाली.  यावेळी मुख्यमंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन व महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.

१५ कोटी रूपयांच्या विकास कामांचे महिला मेळाव्यात ई-लोकार्पण

कोल्हापूर जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, इचलकरंजी (MH-51) या कार्यालयाचा ई- शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. तसेच एकूण 13.50 कोटी रूपयांच्या इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या नुतनीकरणाचे ई -उद्घाटन झाले. एकूण रू. 1.44 कोटी किंमतीच्या जिल्ह्यातील महसूल विभागातील उप विभागीय अधिकारी, तहसीलदार यांना 14 वाहनांचे वाटप करण्यात आले. तसेच श्री. भैरवनाथ शिक्षण व सेवाभावी संस्था संचालित येथील नवीन इमारत व मोफत उपचार योजनेचे ई- उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

०००