करोना संसर्गाची तिसरी लाट मुलांवर अधिक परिणाम करेल, अशी शक्यता वर्तवली जात असल्याने पालकांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून मुलांना घराबाहेर पाठवण्यावर अधिक निर्बंध आले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ते योग्य असले, तरीही मुलांमधील वाढते वजन ही त्यांच्यासाठी भविष्यामध्ये त्रासदायक बाब ठरू शकते याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधले आहे.
बालरोगतज्ज्ञ डॉ. अनुराग पांगरीकर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले, की ‘अनेक मुलांमध्ये मागील दोन वर्षांत दहा ते पंधरा किलो वजन वाढल्याचे दिसून आले आहे. त्याचे थेट परिणाम आता दिसत नसले, तरीही काही दिवसांनी या मुलांमध्ये शारीरिक तक्रारी सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुलांचे वजन योग्य प्रमाणात राहावे याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे. मुलांचा आहार, त्यांचा व्यायाम तसेच झोप हे घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. लॉकडाउनपूर्वी मुले मैदानी खेळांमध्ये आवर्जून सहभाग घ्यायची. शाळा ऑनलाईन झाल्यानंतर मैदानी खेळांशी असलेली सांगड करोना संसर्गामुळे तुटली आहे.’
भावनिक प्रश्नही महत्त्वाचे
करोना संसर्गामध्ये आजूबाजूच्या नकारात्मक बातम्यांचे परिणाम मुलांच्या मनावरही होत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. व्ही. व्ही. ओक यांनी सांगितले. मुले निराश होतात, अंथरुणामध्ये लघवी करतात, घाबरून दचकून उठतात, त्यांच्या मनात असलेली भीती ते व्यक्त करीत नाहीत. शारीरिक स्वरुपाच्या तक्रारींमध्ये दुखणी दिसतात. मात्र अनेकदा त्याचा संबध मुलांच्या भावविश्वाशी असतो. भावनिक आरोग्य सक्षम राहण्यासाठी काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.