Home शहरे अहमदनगर मुळा-भंडारदरा धरणक्षेत्रात जोरदार पाऊस

मुळा-भंडारदरा धरणक्षेत्रात जोरदार पाऊस

कोले (जि. अहमदनगर) : तालुक्यात सर्वदूर आर्द्रा नक्षत्राच्या दमदार सरी कोसळल्या. शुक्रवारी आणि शनिवारी घाटघर येथे ११५ मिलीमीटर म्हणजे पावणे पाच इंच पाऊस झाला. भंडारदरा येथे ७५, रतनवाडी येथे ७६ व वाकी येथे ८२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. भंडारदरा धरणात नव्या ४० दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली.  दमदार पावसाने तालुक्यातील छोटे लघुपाटबांधारे प्रकल्प भरण्यास सुरूवात झाली. शनिवारी सकाळी १९८ दलघफु क्षमतेचा आंबीत लघु पाटबंधारे विभागाचा तलाव ओसंडून वाहू लागल्याने मुळा नदी वाहती झाली. त्यानंतर पिंपळगाव खांड धरणात पाण्याची आवक सुरू झाली. आदिवासी भागात भात आवणीच्या पूर्व मशागतीसाठी औत-काठीचे ‘ऐठणं’ सुरू झाले. अकोले तालुक्यातील घाटघर, रतनगड, भंडादरा, हरिश्चंद्रगड, कळसूबाई परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच मुळा आणि भंडारदरा धरणात पावसाच्या पाण्याची आवक सुरू झाली आहे.

भंडारदरा धरण पाणलोटक्षेत्रात कमी अधिक प्रमाणात पावसाची संततधार टिकून आहे. पाणलोटात सुरू झालेल्या पावसाने धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे. शनिवारी सकाळी सहा वाजेपर्यंत भंडारदरा धरणात ४० दशलक्षघनफुट नवीन पाण्याची आवक झाली आहे. भाताची रोपे तरारू लागली आहेत. भात शेती मशागतीलाही सुरुवात झाली आहे. 


माती-गाळ करण्यासाठी लाकडी नांगराने नांगरट व कुळवाने पाळी घालण्याचे काम सुरु झाले आहे. तालुक्यातील भंडारदरा धरणात ३१६ दशलक्षघनफुट तर निळवंडे धरणात ५५० दशलक्षघनफुट पाणीसाठा आजमितीस आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस जवळपास ५०० ते ५५० मिलिमीटरने मागे पडला आहे.