मुसळधार पावसामुळं रुग्णालय कर्मचाऱ्यांचा झाला खोळंबा

मुसळधार पावसामुळं रुग्णालय कर्मचाऱ्यांचा झाला खोळंबा
- Advertisement -

म. टा. विशेष प्रतिनिधी

मुंबई : पावसाचा जोर वाढत गेल्यामुळे रुग्णालयांच्या परिसरासह अनेक ठिकाणी पावसाचे पाणी शिरले. पावसाचा जोर वाढत गेल्यानंतर केईएम रुग्णालयामध्ये रात्री उशिरा पाणी साचले होते. सकाळी पावसाचा जोर थोडा कमी झाल्यावर हे पाणी ओसरले. नायर रुग्णालयाच्या परिसरामध्येही पाणी साचले. सकाळी रुग्णालयामध्ये येण्यासाठी निघालेल्या अनेक कर्मचाऱ्यांना ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे माघारी फिरावे लागले.

रविवारी सकाळीही मुंबईतील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर होता. नायर रुग्णालयातील रात्रीच्या पाळीला असणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांपैकी काहीजणांनी सकाळीही ड्युटी केली. पाण्याचा उपसा करण्यासाठी व्यवस्था केल्यामुळे प्रत्येक वर्षी होते तशी पाऊसकोंडी यंदा या भागात झाली नाही. मात्र तरीही पाणी साचल्यामुळे रुग्णांना तसेच कर्मचाऱ्यांनाही रुग्णालयामध्ये जाण्यामध्ये पावसाचा अडसर होताच. परळ भागात अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. हा परिसरामध्ये केईएम, टाटा, वाडिया यासारखी रुग्णालये असल्यामुळे रुग्णांची येथे नेहमीच गर्दी असते.

करोनाव्यतिरिक्त अन्य वैद्यकीय सेवा सुरु झाल्यामुळे आता रुग्णसंख्येचा ओघही वाढल्याचे डॉ. शिरिष घुले यांनी सांगितले. रविवार असल्यामुळे आज गर्दी कमी होती. पावसाचा जोर कमी झाला नाही तर रुग्णसंख्येवर त्याचा निश्चितपणे परिणाम होईल, असेही त्यांनी सांगितले. पालिकेच्या तसेच खासगी रुग्णालयांमध्ये अनेक वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स तसेच तंत्रज्ञ रुग्णालयांपर्यंत पोहचू शकले नाही. गाड्या उशिराने धावत असल्याने संध्याकाळी ड्युटीवर येणाऱ्यांनाही येण्यास उशीर झाला. मात्र सकाळच्या तुलनेमध्ये संध्याकाळी मनुष्यबळाची उपलब्धता होती.

Source link

- Advertisement -