बोरघर / माणगांव:माणगांव तालुक्यात गेली तीन दिवस संततधार पडणार्या पावसामुळे माणगांव तालुक्यातील कुंभे – मांजुर्णे रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणे धोकादायक झाले आहे. त्यामुळे वाहन चालक, प्रवासी आणि निसर्ग प्रेमी पर्यटक यांनी या मार्गाचा वापर टाळावा. जेणेकरून आपणास आपली होणारी गैरसोय आणि संभाव्य धोके टाळता येतील.
कुंभे- मांजुर्णे केळगण ही गावे रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील सर्वात उंचावर असलेली निसर्ग रम्य ठिकाणे म्हणून ओळखली जातात. समुद्र सपाटीपासून हजारो मीटर उंचीवर असलेली ही तीन्ही गावे रायगड जिल्ह्याच्या पूर्वेला असलेल्या सह्याद्रीच्या उंच उंच डोंगर रांगांच्या उंच शिखर माथ्यावर
वसलेली आहेत. त्यामुळे या ठिकाणी निसर्गाने निसर्ग सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण केली आहे. या ठिकाणी अनेक छोटे मोठे नयनरम्य धबधबे आहेत. म्हणून पावसाळ्यात या ठिकाणी भरपूर निसर्ग प्रेमी आणि पर्यटक पावसाळी निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात. सर्वात उंचावर असलेल्या कुंभे या ठिकाणाची शासनाने प्रस्तावित काळ कुंभे या संभाव्य प्रकल्पासाठी निवड केली आहे. कुंभे हे माणगांव तालुक्यातील रायगड जिल्ह्याच्या सीमेवरील ठिकाण आहे. इथून पुढे पुणे जिल्ह्याची हद्द सुरू होते. कुंभे या गावची दुसरी ओळख म्हणजे हे माणगांव तालुक्यातील अत्यंत दुर्गम आणि सर्वात उंचावरील ठिकाण अशी आहे. सह्याद्रीच्या या उंच डोंगर माथ्यावर उगम पावणारी संपूर्ण नदी या ठिकाणच्या उंच कड्यावरून खोल दरीत कोसळते हा रोमांचक नैसर्गिक अद्भुत नजारा पाहण्यासाठी या ठिकाणी निसर्ग प्रेमी आणि पर्यटक येत असतात. एकेकाळी अत्यंत दुर्गम असलेल्या माणगांव तालुक्यातील कुंभे या गावाला आणि प्रस्तावित काळ कुंभे प्रकल्पाला जोडण्यासाठी शासनाने करोडो रुपये खर्च करून कुंभे गावाच्या मार्गात आड येणाऱ्या प्रचंड मोठ्या अभेद्य डोंगराला भूयारी मार्ग खोदून रस्ता बनवला आहे. या रस्त्यामुळे कुंभे गावात जाण्यासाठी किंबहुना रहदारी साठी रस्ता निर्माण झाला त्यामुळे या ठिकाणी जाणे – येणे सोईस्कर झाले आहे. परंतु सद्या हा मार्ग पावसामुळे खचल्यामुळे या ठिकाणी जाणे- येणे सद्या ठप्प झाले आहे. त्यामुळे पर्यटकांनी या मार्गाचा वापर सद्या टाळावा. सदर रस्ता खचल्याने या ठिकाणचे ग्रामस्थ, प्रवासी आणि पर्यटकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी तसेच या रस्त्याला दुसरा कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने संबंधित विभागाने तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करावी.