Home ताज्या बातम्या मूकबधिर विद्यार्थ्यांनी शब्दांच्या पलीकडे जाऊन एकमेकांच्या भावना समजून घेत शिक्षकदिन केला साजरा

मूकबधिर विद्यार्थ्यांनी शब्दांच्या पलीकडे जाऊन एकमेकांच्या भावना समजून घेत शिक्षकदिन केला साजरा

0

मूकबधिर विद्यार्थ्यांनी शब्दांच्या पलीकडे जाऊन एकमेकांच्या भावना समजून घेत शिक्षकदिन केला साजरा

भूषण गरुड
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार ५ ऑगस्ट २०१९ रोजी आधार मूकबधिर विद्यालय (निवासी-अनिवासी) इंदिरा नगर,बिबवेवाडी,पुणे शाळेच्या निरागस विद्यार्थ्यांना ना शब्द, ना आवाज, तरीही एकमेकांची भाषा ओळखण्याचे त्यांच्यातील कसब अफाट होती. “शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले’ या मंगेश पाडगावकरांच्या गीताप्रमाणेच विद्यार्थ्यांनी शब्दांच्या पलीकडे जाऊन एकमेकांच्या भावना समजून घेत शिक्षकदिन साजरा केला. यावेळी बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात, पोलीस गणेश दुधाणे, विनोद सोरटे यांनी मूकबधिर विद्यार्थ्यांनी बनवलेल्या गणेश सुबक मूर्तीचे पूजन करून आरती केली.

आधार मूकबधिर विद्यालय (निवासी-अनिवासी) शाळेत शारीरिक अपंगत्व असलेले असे एकूण ११९ विद्यार्थी या शाळेत शिकत आहेत. ८९मुले व ४०मुली वसतिगृहात राहतात. या शाळेत एकूण १९ शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यासाठी प्राचार्य अरुणा निकम, विशेष शिक्षक जयंत वानखेडे, पूर्वा महाले, मंजरी कुलकर्णी, अनुसा राठोड, माया ननवरे, चंद्रभागा बांबळे, विकास राजगुरू, स्नेहल सोळवंडे, विशाखा सावंत, मालती कामटे, विद्या गोखले, कल्पना ढवळे, गणेश मडके, शिंदे, क्रीडाशिक्षक गीता ठकार, कला शिक्षक विजयकांत कुचेकर, सुप्रिया घटे, सरिता काळे यांनी परिश्रम घेतले.

शाळेविषयी माहिती देताना मुख्याध्यापक अरुणा निकम सांगतात की, इतर शाळांमध्ये पहिली, दुसरी असे वर्ग असतात त्याप्रमाणे इथल्या वर्गाना पायरी म्हणातात. अशा एक ते पाच पायऱ्या शाळेत आहेत. पहिल्या पायरीत तीन ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना प्रवेश दिला जातो. तिसऱ्या व त्यापुढील वर्गाचा अभ्यासक्रम एक वर्षांत पूर्ण होत नाही म्हणून हे वर्ग प्रत्येकी दीड वर्षांचे असतात. सर्वाना प्रवेश, निवास, भोजनाची मोफत सोय पुरविली जाते. प्रवेश देते वेळीच प्रत्येक मुलाची श्रवणचाचणी केली जाते. त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेनुसार श्रवणयंत्रे पुरविली जातात. सकाळी सहा वाजता मुलांचा दिनक्रम सुरू होतो. बरोबर आठ वाजता चहा, नाश्ता देऊन सकाळी ११ ते ५ या वेळात शाळा भरते. दुपारी एक तास जेवणाची सुट्टी असते.
राष्ट्रगीताने सुरू होणारा परिपाठही वैशिष्टय़पूर्ण असतो. सगळा संवाद हावभावाच्या म्हणजेच खुणांच्या भाषेत असतो. विशिष्ट खुणांसह लयबद्ध हालचालींतून होणारे राष्ट्रगीत सामान्यांसाठी वेगळीच अनुभूती असते. भारत भाग्य विधाता.. सांगताना एकाच वेळी अगदी बेमालूमपणे सर्वाचे हात कपाळाला स्पर्शून आपणही तेवढेच देशभक्त असल्याचे त्यांच्या देहबोलीतून स्पष्टपणे जाणवते. परिपाठानंतर सुरू होते औपचारिक शिक्षण. या मुलांना पायरीनुसार बालभारतीचाच अभ्यासक्रम आहे. सगळ्या मुलांचे ध्यान केंद्रित व्हावे यासाठी विशिष्ट प्रकारच्या बारा अष्टकोनी वर्गखोल्या तयार करण्यात आल्या आहेत.
एका पायरीत अधिकाधिक आठ मुले असतात. सर्व पायऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षित शिक्षक आहेत. एकूण १४ शिक्षकांपकी तीन कलाशिक्षक व एक वाचाउपचारतज्ज्ञ शिक्षक आहे. अध्ययन अध्यापन प्रक्रिया इतर शाळांसारखीच, मात्र केवळ खुणांच्या भाषेतच चालते. शिक्षकांनी शिकविलेल्या खाणाखुणांच्या व्यतिरिक्त प्रत्येक मुलाची स्वत विकसित केलेली वेगळीच भाषा अचंबित करणारी आहे. आम्ही शिक्षकदेखील मुलांची वैशिष्टय़पूर्ण भाषा त्यांच्याकडून शिकत वेळोवेळी स्वतला अपडेट करत असतो, असे तेथील विशेष शिक्षक जयवंत वानखेडे अभिमानाने सांगतात. विशेष म्हणजे या मुलांचा ‘सिक्स सेन्स’ फार जागृत असतो. ऐकायलाच येत नसल्याने आजूबाजूच्या कोणत्याही आवाजाने त्यांचे लक्ष विचलित होत नाही. त्यामुळे जे काम चालू असेल ते अगदी एकाग्रचित्ताने होते. शाळेत आधुनिक स्पीच व ओडिओमीटर रूम व यंत्रसामुग्री, प्रशस्त संगणक कक्ष आणि भाषा, गणित, विकासाकरिता विशेष प्रशिक्षण दिले जाते.
पुस्तकी ज्ञानाबरोबरच मुलांच्या कलागुणांची जोपासना करण्यासाठी शाळा विशेष लक्ष देते. कारण हीच कला त्यांची भविष्यातील रोजीरोटी ठरणारी असते. येथील कलाशिक्षक देविदास गोरे त्यासाठी अपार मेहनत घेतात. मेणबत्त्या तयार करणे, फिनाइल, शिवणकाम, मातीकाम, लाकडी कलाकुसरीच्या वस्तू, भेटकार्डे, राख्या, आकाशकंदील तयार करण्याचे काम मुले आवडीने करतात. गणेशोत्सवासाठी मुलांनी आकर्षक मातीचे गणपती बनविले आहेत. संस्थेच्या वतीने मूकबधिरांसाठी दरवर्षी जिल्हास्तरीय नृत्यस्पर्धा घेतली जाते. सुदृढ मुलांना लाजवतील इतक्या लिलया पद्धतीने मुले नृत्यात दंग होतात. त्या वेळी लावण्यात आलेल्या गाण्याचा आवाज प्रेक्षकांसाठी असतो, नाचणाऱ्या मुलांच्या बाजूलाच असलेल्या प्रशिक्षकाच्या हावभावांकडे मुलांचे लक्ष असते. अपंगांचे शिक्षण, पुनवर्सन व स्वावलंबन अशा त्रिसूत्री ध्येयप्राप्तीकरिता शाळा अविरत प्रयत्नशील आहे.