
मुंबई, दि. १२ : राज्यात मृदसंधारण व जलसंधारण कामांची प्रत्यक्ष स्थळ पडताळणी (Ground Truthing) करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून या निर्णयानुसार, महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र (MRSAC), नागपूर आणि मृद व जलसंधारण विभाग यांच्या सहकार्याने मोबाईल अॅप व वेब पोर्टल विकसित करण्यात येणार असल्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितले. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
यापुर्वी कृषी विभाग, जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद, वन विभाग, रोजगार हमी विभाग, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विविध योजनांअंतर्गत मोठ्या प्रमाणात मृदसंधारण व जलसंधारण कामे करण्यात आली. या कामांच्या डिजिटल नोंदणी आणि पडताळणी होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्य उद्दिष्टे:
- MRSAC,नागपूर यांच्याकडील नोंदींची पडताळणी – उपग्रह इमेजरीच्या आधारे मृदसंधारण व जलसंधारण संरचनांचे मॅपिंग करून त्या संरचनांची प्रत्यक्ष पाहणी करणे.
- नवीन संरचनांची नोंदणी–शिवार फेऱ्यांद्वारे अद्याप नोंद न झालेल्या व सध्या सुरू असलेल्या नवीन संरचनांची माहिती गोळा करणे.
- संरचनांचे व्यवस्थापन व सुधारणा–संरचना दुरुस्ती, नवीन संरचना बांधणी, नाला खोलीकरण, गाळ काढण्यासंबंधी माहिती मोबाईल अॅपद्वारे नोंदवणे.
तांत्रिक सुविधा
विशेष मोबाईल अॅप – केवळ नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध, जिल्हानिहाय, तालुकानिहाय व गावनिहाय डिजिटल माहिती.
Geofence तंत्रज्ञान – उपग्रह आधारित स्थळ नोंदणी व पडताळणीसाठी.
कार्यपद्धती
गाव पातळीवर शिवार फेरीद्वारे प्रत्यक्ष स्थळ पाहणी. स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांच्या सहकार्याने संरचनांची पडताळणी. मोबाईल अॅपद्वारे थेट डिजिटल नोंदणी करणे.
या निर्णयामुळे मृदसंधारण व जलसंधारण क्षेत्रातील पारदर्शकता वाढणार असून, भविष्यातील जलसंधारण धोरणांसाठी अचूक माहिती मिळणार आहे.
हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२५०३१२१५४३२३१६२६ असा आहे.
०००
राजू धोत्रे/विसंअ/