Home ताज्या बातम्या मॅनहोलमध्ये पडलेल्या २ महिला बचावल्या

मॅनहोलमध्ये पडलेल्या २ महिला बचावल्या

0
मॅनहोलमध्ये पडलेल्या  २ महिला बचावल्या

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

नालेसफाईसह दावे फोल ठरले असतानाच, बुधवारच्या मुसळधार पावसात गावातील एका उघड्या मॅनहोलमध्ये दोन महिला पडल्याची बाब समोर आल्याने मुंबई पालिकेस आणखी नामुष्की सहन करावी लागत आहे. या महिला बालंबाल बचावल्या. मात्र त्या घटनेने शहरातील मॅनहोलवरील झाकणेदेखील व्यवस्थित नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे.

भांडुप गावातील एका रस्त्यावर मॅनहोलचे झाकण उघडे होते. बुधवारच्या प्रचंड पावसात उघडे असल्याचे लक्षात येत नव्हते. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिथून जात असलेल्या दोन महिला या उघड्या मॅनहोलमध्ये पडल्या. कोणत्याही इजा न होता त्या दोघीही सुरक्षित बाहेर पडल्या. मात्र या घटनेचे चित्रण तिथे असलेल्या सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाले.

तपासणीचे आदेश

ही घटना समोर येताच पालिकेचे धाबे दणाणले आणि तातडीने संपूर्ण शहरातील मॅनहोल व्यवस्थित आहेत का ते पाहण्यासाठी धावपळ सुरू झाली. घटनेचे गांभीर्य ओळखून महापौर किशोरी पेडणेकर यांनीही तिथे जाऊन पाहणी केली. पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी मुंबईतील सर्व रस्त्यांवरील मॅनहोलची तातडीने आणि नव्याने तपासणीचे आदेश दिले आहेत. भांडुप गावातील त्या मॅनहोलच्या ठिकाणी नवीन मॅनहोलची व्यवस्थाही केली आहे.

मुंबईत ७३ हजार मॅनहोल

मुंबईत ७३ हजार मॅनहोल असून त्यातील अनेक मॅनहोलवरील झाकणे गायब झाल्याच्या तक्रारी आहेत. त्याठिकाणी झाकणे बसविण्यात आली, तरीही ती चोरी होत असल्याने उघड्या मॅनहोलची समस्या मिटलेली नाही.

भाजपचे टीकास्त्र

भांडुपमधील मॅनहोलप्रकरणी भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी पालिकेवर टीका केली आहे. पालिका कुंभकर्णाप्रमाणे निद्रेत असून २०१९ मध्ये असल्फा येथेही एक महिला मॅनहोलमध्ये पडली होती. त्या महिलेचा मृतदेह हाजी अली येथे सापडला होता. त्यापूर्वी २०१७मध्ये मुसळधार पावसात प्रभादेवीतील तुळशी पाइप मार्गावरील उघड्या मॅनहोलमध्ये पडून डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू ओढविला होता, याचीही आठवण त्यांनी करून दिली आहे. तेव्हाही मॅनहोलवर झाकणे बसविण्याचे आदेश देण्यात आले होते. पण ते अंमलात आणले जात नाहीत. पालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासनास मुंबईकरांच्या हिताची चिंता नसल्याची टीका कोटक यांनी केली आहे.

Source link